पिंपरी चिंचवड : प्रभागांची रचना ही राष्ट्रवादीसाठी अनुकूल, तर भारतीय जनता पक्षासाठी 'डोकेदुखी'ची ठरणार

कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांचाही वॉर्ड अत्यंत त्रासदायक ठरण्याची शक्‍यता..


प्रेस मीडिया ऑनलाइन :

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : पठाण एम एस :

पिंपरी - पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी  प्रभागरचनेचा प्रारुप आराखडा जाहीर करण्यात आला. प्रभागांची रचना ही राष्ट्रवादीसाठी अनुकूल, तर भारतीय जनता पक्षासाठी 'डोकेदुखी'ची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


शिवसेने बाबत बऱ्याचअंशी फायदेशीर तर कॉंग्रेससाठी ही रचना अडचणीची ठरू शकते. प्रभागरचनेबाबत सर्वच पक्षांनी सकारात्मक दावे केले असले तरी भाजपाच्या अनेक मातब्बरांचे राजकीय भवितव्य अडचणीचे ठरण्याची शक्‍यता आहे. सन 2017 साली राज्यातील सत्तेचा फायदा उठवित ज्या पद्धतीने भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी प्रभागरचना आपल्या फायद्याची करून घेतली होती, तोच कित्ता गिरवत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी 'त्याचे' उट्टे काढल्याचेच आजच्या रचनेवरून स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने आज (मंगळवारी) प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध केला. अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच वर्चस्व पहावयास मिळत आहे. आपल्या स्थानिक नेत्यांना 'सेफ' झोनमध्ये नेण्यात तसेच भाजपाच्या मातब्बरांना अडचणीत आणण्याच्या दृष्टीकोनातून ही रचना करण्यात आली असली तरी राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेलाही काही प्रभागात संधी मिळेल, याची काळजी घेण्यात आली आहे. एका बाजूला शिवसेनेला अपेक्षित ताकद पुरविण्याचा प्रयत्न प्रभाग रचनेतून झाला असला तरी राज्यातील सत्तेत असलेल्या कॉंग्रेसची मात्र पुरती गोची करण्यात आली आहे. प्रभागरचनेचा सर्वाधिक फटका भाजपा पाठोपाठ कॉंग्रेसलाच बसण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्थानिक मातब्बर नेत्यांचे प्रभाग खूपच काळजीपूर्व तयार केल्याचे केल्याचे दिसून येत आहे. भाजपचे प्राबल्य असलेल्या परिसराची अत्यंत चपखलपणे तोडफोड करण्यात आली आहे. संत तुकारामगर, भोसरी, मासुळकर कॉलनी, संभाजीनगर, शाहूनगर, निगडी प्राधिकरण, दळवीनगर, भोईरनगर, पिंपरी कॅम्प, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर, रावेत हे प्रभाग पूर्तत: राष्ट्रवादीला सोयी ठरण्याची शक्‍यता आहे. या भागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर पॅनेल प्रमुख असणार आहेत. या पॅनेलप्रमुखांवर तीनही नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे. अण्णा बनसोडे, आझम पानसरे, विलास लांडे, संजोग वाघेरे, राजू मिसाळ, योगेश बहल, मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, नाना काटे, डब्बू आसवाणी, वैशाली घोडेकर हे सर्वच नेते अडचणीत येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.

तर भाजपमधून राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या अनेकांना 'अपेक्षित' वॉर्ड तयार झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, या रचनेमध्ये शिवसेनेच्या नेत्यांचीही काळजी घेण्यात आली आहे. थेरगाव, ताथवडे, यमुनानगर, मोशी-बोऱ्हाडेवाडी असे काही प्रभाग शिवसेनेसाठी सोईचे ठरणार आहेत. त्यामुळे शहरप्रमुख सचिन भोसले, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर युवा सेना प्रमुख विश्‍वजीत बारणे, रेखा दर्शिले, सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांचा महापालिकेत येण्याचा मार्ग सोपा होणार आहे. एका बाजूला राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेनेची काळजी घेण्यात आली असली तरी कॉंग्रेसला मात्र अपेक्षित प्रभागरचना झालेली नाही. कॉंग्रेसच्या शहराध्यक्षांचाही वॉर्ड अत्यंत त्रासदायक ठरण्याची शक्‍यता आहे.

आजच जाहीर झालेल्या प्रभागरचनेमुळे भाजपाच्या तब्बल 20 ते 25 नगरसेवकांची अडचण झाली आहे. यापूर्वीपासून तयारीत असलेले व आजच्या प्रभागरचनेमुळे अडचणीत आलेले अनेकजण पक्षांतराच्या तयारीत आहेत. येत्या काही दिवसांत पक्षांतराला वेग येण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादीने पूर्वी दावा केल्याप्रमाणे भाजपाचे 20 हून अधिक विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला लागण्याची शक्‍यता आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील काही नगरसेवक भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. दोन महिन्यांमध्ये निवडणुका होणार असल्यामुळे पक्षांतराची उड्डाणे काही दिवसांतच सुरू होण्याची लक्षणे आजच्या प्रभागरचनेनंतर निर्माण झाली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post