महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

महानगरपालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने   कंबर  कसली 

प्रेस मीडिया लाईव्ह.कॉम :

 पिंपरी चिंचवड : पठाण एम एस : 

 पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांचा कालावधी 13 मार्चला संपणार असून येत्या एप्रिल अथवा मे महिन्यामध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपामध्ये येण्यास इतर पक्षातील अनेक नगरसेवक इच्छुक आहेत.त्यातील राष्ट्रवादीचे दहा आणि शिवसेनेचे दोन नगरसेवक भारतीय जनता पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचा दावा महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला. ढाके यांनी केलेल्या या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आल्याने शहरात राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने शहराध्यक्ष बदलत कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर सत्ताधारी भाजपने देखील पुन्हा महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी कंबर कसली आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर पक्षांतर्गत मतभेद, तिकीट वाटपाच्या मुद्यांवरून अनेक जण पक्ष बदलतात. भाजपाचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी पदाचा आणि भाजपाच्या सदस्यत्वचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला.

त्यामुळे नवनियुक्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी हा सत्ताधारी भाजपला दिलेला पहिला धक्का मानला जात आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सत्ताधारी भाजपमधील अनेक नगरसेवक, कार्यकर्ते हाती घड्याळ घेऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात असून बोराटे यांच्या रुपाने राष्ट्रवादीने हा दावा प्रत्यक्षात आणण्यास सुरुवातही केली आहे.

बोराटे यांच्या पक्षप्रवेशावर ढाके यांनी पत्रकारांशी संवाद साधत वरील गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, भाजपमधून एखादा नगरसेवक बाहेर पडला तर भाजपवर त्याचा जास्त परिणाम होणार नाही. भाजपकडे सक्षम उमेदवारांची कमी नाही. शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये भाजपकडे सक्षम उमेदवार आहेत. उलट राष्ट्रवादीचे दहा व शिवसेनेचे दोन असे बारा नगरसेवक आमच्या संपर्कात आहे. लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post