महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून नवाब मलिक यांना ठाम पाठिंबा

नवाब मलिक यांच्या अटकेचा तीव्र निषेध सुद्धा या वेळी नोंदविण्यात आला.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्या अटकेचे तीव्र पडसाद आज राज्यभरात उमटले. ठिकठिकाणी झालेल्या निदर्शनांतून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून नवाब मलिक यांना  पाठिंबा दर्शविण्यात आला आहे .ईडीच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या कारवायांविरोधात मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळय़ाजवळ जोरदार निदर्शने करण्यात आली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मंत्री, आमदार तसेच नेते या आंदोलनात सहभागी झाले. 'महाराष्ट्र लढेगा, नही झुकेगा' अशा घोषणा देत नवाब मलिक यांच्या अटकेचा तीव्र निषेध सुद्धा या वेळी नोंदविण्यात आला.

नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी सकाळी 10 वाजता मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळय़ासमोर महाविकास आघाडीतील नेते जमले व त्यांनी जोरदार निदर्शने केली. 'ईडी मुर्दाबाद…', 'मोदी सरकार हाय हाय…' अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. सकाळी 10 वाजता सुरू झालेली निदर्शने दुपारी 2 वाजेपर्यंत सुरूच होती. 'महाराष्ट्र ना कधी दिल्लीसमोर झुकला ना कधी झुकणार…', 'आवाज कुणाचा महाविकास आघाडीचा' अशा जोरदार घोषणा व फलक झळकावत नेत्यांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक, नगरसेवक कप्तान मलिक, सलील देशमुख, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार, खनिज व बंदरमंत्री अस्लम शेख, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) सतेज ऊर्फ बंटी पाटील, आदिवासी मंत्री के. सी. पाडवी, लोकभारतीचे शिक्षक आमदार कपिल पाटील, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप, प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी मंत्री नसीम खान, आमदार सुनील अण्णा टिंगरे, आमदार कारेमोरे, आमदार चंद्रिकापुरे, भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार हेमंत टकले, माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार विद्या चव्हाण, माजी आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार अमर राजोरकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदींसह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post