मात्र काही शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय

प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर : मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : महानगरपालिका शाळांचा पट वाढत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगतीही चांगली आहे; मात्र काही शाळांच्या इमारतींची अवस्था दयनीय आहे. येथे किमान सुविधा उपलब्ध दिल्या पाहिजेत.


वाढत्या पटसंख्येसाठी काही शाळांत इमारत अपुरी पडू लागली असून इथे विस्तारीकरणाची गरज आहे; मात्र या शाळांच्या डागडुजीसाठी आणि नवी इमारत बांधण्यासाठी वर्षाकाठी एक ते दीड कोटी रुपयेच मंजूर होतात. त्यामुळे महानगरपालिका अर्थसंकल्पात शाळांसाठी निधी वाढवणे क्रमप्राप्त आहे.

शहरात १९९२ ला महापालिकेच्या ७५ शाळा होत्या. सध्या ५८ शाळा उरल्या आहेत. खासगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे महापालिका शाळांचा पट कमी झाला. काही शाळा जवळच्याच शाळांत समाविष्ट करण्यात आल्या; मात्र १० वर्षांत महापालिका शिक्षक आणि काही शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. आता वाढणाऱ्या पटसंख्येसाठी इमारतींचा विस्तारही केला गेला पाहिजे; मात्र यासाठी असणारी आर्थिक तरतूद कमी आहे. महापालिका शिक्षणासाठी वर्षाकाठी सुमारे ३५ कोटी रुपये खर्च करते; मात्र यातील ३३ कोटी रुपये हे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार आणि आस्थापनावर खर्च होतात. महापालिका शाळांच्या डागडुजीसाठी स्वतंत्र निधी देते; मात्र हा निधी कमी पडतो. शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे, क्रीडा साहित्य, स्वच्छतेची साधने या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. इमारतींचे कुंपण आणि सुरक्षा यासाठीही उपाय योजनांची आवश्यकता आहे.

पटसंख्या अधिक असणाऱ्या शाळा

  • जरगनगर विद्यालय, जरगनगर

  • जोतिर्लिंग विद्यामंदिर, पाचगाव

  • संभाजीनगर विद्यामंदिर, नाळे कॉलनी

  • विजयमाला घाटगे विद्यामंदिर, नागाळा पार्क

  • राजोपाध्येनगर विद्यामंदिर, राजोपाध्येनगर

  • यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर, लक्षतीर्थ वसाहत

  • आण्णासाहेब शिंदे विद्यामंदिर, लक्षतीर्थ वसाहत

  • प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर, जाधववाडी

विस्तारीकरणाची गरज असणाऱ्या शाळा

  • नेहरूनगर विद्यामंदिर, नेहरूनगर

  • ग. गो. जाधव विद्यामंदिर, बोंद्रेनगर

  • विचारे विद्यालय, फुलेवाडी

  • प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी

महापालिका शाळांची पटसंख्या वाढत आहे; मात्र या शाळांच्या इमारतीची डागडुजी आणि विस्तारासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नाही. जिल्ह्यातील मंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- अशोक पोवार,शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते.

Post a Comment

Previous Post Next Post