सांगली जिल्हा परिषदअध्यक्षांच्या घरी भाजपच्या काही सदस्यांकडून जोरदार राडा

अध्यक्षांच्या पतीला आणि दिराला मारहाण..

 एका पाण्याच्या निविदेच्या वादातून ही हाणामारी 

प्रेस मीडिया ऑनलाइन :

सांगली : सांगली जिल्हा परिषदअध्यक्षांच्या घरी भाजपच्या  काही सदस्यांकडून जोरदार राडा करण्यात आला असल्याचा आरोप होत आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.या दरम्यान संबंधित सदस्यांनी अध्यक्षांच्या पतीला आणि दिराला मारहाण केली असल्याचा आरोपही स्वतः अध्यक्षा प्राजक्ता कोरे  यांनी केला आहे. एका पाण्याच्या निविदेच्या वादातून ही हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही बाजूंनी तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असून अध्यक्षा भाजपच्याच आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्हा परिषदेत सत्ताधारी भाजपमध्ये मागच्या काही दिवसांपासून दोन गट पडल्याची चर्चा आहे. मात्र सोमवारी रात्री या चर्चांना दुजोरा देणारी घटना घडली. पाण्याच्या एका निविदेवरुन हे दोन गट आमने-सामने आले आणि अध्यक्षा प्राजक्ता कोरे, त्यांचे पती नंदू कोरे, कुटुंबातील अन्य आणि जिल्हा परिषद सभापती आणि काही सदस्यांमध्ये वाद झाला. त्याच वादातून अध्यक्षांच्या घरी अभूतपुर्व राडा झाला. यात अध्यक्षांच्या बंगल्यामधील खुर्च्या आणि अंगणातील कुंड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे. तर अध्यक्षाच्या निवासस्थानात दारू पिऊन येऊन सभापती आणि काही सदस्यांनी मला आणि माझ्या भावास मारहाण केल्याचा आरोप नंदू कोरे यांनी केला.


या तोडफोड प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे भाजपचे समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, महिला आणि बालकल्याण सभापती सुनिता पवार यांचे पती सुनील पवार, शिक्षण आणि आरोग्य सभापती आशा पाटील यांचे पती सुनील पाटील, अरुण बालटे, अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांच्याविरोधात सांगलीच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तर, प्रमोद शेंडगे यांनी आरोप फेटाळून लावत आम्हालाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे पती आणि दिर यांनी अध्यक्षांच्या निवासस्थानी बोलावून मारहाण केली असल्याचा आरोप केला. आज स्थायी समितीचे मिटिंग होती, निविदेला आज मान्यता घेणे गरजेचे होते. त्यासाठी दबाव टाकत आम्हाला मारहाण केली आहे, असा आरोपही शेंडगे यांनी केला आहे. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या पती आणि दिराविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरु होती.

Post a Comment

Previous Post Next Post