सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग 16(अ) पोटनिवडणूक जाहीर प्रचाराची सांगता



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 सांगली महानगरपालिकेच्या प्रभाग 16(अ) पोटनिवडणूक जाहीर प्रचाराची सांगता प्रचारफेऱ्या व जाहीर सभेने आज झाली. शिवसेनेचे उमेदवार महेंद्र चंडाळे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते, सांगली-सातारा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांची जोरदार सभा झाली.तर, काँग्रेस उमेदवार तोफिक शिकलगार यांच्या प्रचारार्थ कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढून प्रचाराची सांगता करण्यात आली.

सांगली महापालिकेचे माजी महापौर हारुण शिकलगार यांच्या मृत्यूमुळे प्रभाग 16 (अ) मध्ये पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख महेंद्र चंडाळे मोठय़ा ताकदीने या निवडणुकीत उतरले आहेत, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून हारुण शिकलगार यांचे सुपुत्र तौफिक शिकलगार निवडणूक लढवत आहेत. भाजपच्या वतीने अमोल गवळी, वंचित बहुजन आघाडीकडून उमर फारूक ककमरी, अपक्ष म्हणून काँग्रेस बंडखोर उमेदवार सुरेश सावंत हे नशीब आजमावत आहेत. गेले आठवडाभर प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उतरले आहेत. पंचवार्षिक निवडणुकीसाठी अवघे दीड वर्ष उरले असताना एका प्रभागाची पोटनिवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रतिष्ठsची केली आहे.

अखेरच्या दिवशी दिग्गजांची हजेरी

मंगळवारी (दि. 18) होणाऱया या पोटनिवडणुकीच्या जाहीर प्रचाराची आज सांगता झाली. शेवटच्या दिवशी या प्रभागात सर्वच पक्षांच्या दिग्गजांनी हजेरी लावली. शिवसेनेचे उमेदवार महेंद्र चंडाळे यांच्या प्रचारार्थ मारुती चौकात शिवसेनेचे संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांची सभा झाली. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या वेळी उमेदवार महेंद्र चंडाळे, जिल्हाप्रमुख संजय विभुते, उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर, बजरंग पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार तौफिक शिकलगार यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढून सांगता करण्यात आली. या पदयात्रेत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post