कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ससून रुग्णालयाला मोठा फटका,

. ससून मध्ये डॉक्टर्स, नर्स सह 284 जण पॉझिटिव्ह 


प्रेस मीडिया :

जीलानी ( मुन्ना ) शेख :

पुणे :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ससून रुग्णालयाला मोठा फटका बसला आहे. ससून मध्ये डॉक्टर्स, नर्ससह 284 जण पॉझिटिव्ह झाले आहेत. गेल्या 24 तासात 26 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.पुणे महानगरपालिकाद्वारे कोरोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनचे नियम करण्यात आले आहेत. सण, उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व शासकीय / निम शासकीय व खासगी आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. दोन डोस घेतलेल्यांना सरकारी कार्यालयात प्रवेश असणार आहे. तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, कोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर कठोर निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तसेच पुण्यातून कोरोना हद्दपार करण्याचा निर्धार पुणे महापालिकेने केला आहे.

पुण्यात लवकरच लस निर्मिती

दरम्यान, पुण्यातील मांजरीत लवकरच लस निर्मिती होणार आहे. भारत बायोटेकच्या मांजरीतील प्रकल्पाची औषध मानक नियंत्रण संस्थेच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली आहे. दोन आठवड्यात लस उत्पादन सुरु होण्याची शक्यता आहे.

पुण्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे नव्याने होणाऱ्या या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मांजरीत कोवॅक्सिनची निर्मिती होणार अूसन साडेसात कोटी डोस तयार करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post