पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ

 प्रभाग रचनेचा प्रारुप आरखडा मंगळवारी  एक फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार..



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असून प्रभाग रचनेचा प्रारुप आरखडा मंगळवारी  एक फेब्रुवारीला प्रसिद्ध केला जाणार आहे. या आराखड्यावर हरकती नोंदविण्यासाठी तसेच सूचना करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.या हरकतींवर 26 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून 2 मार्च रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह हा आराखडा निवडणूक आयोगाला पाठविण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.


पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत 13 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे नोंव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रभागरचनेची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षण, करोना यासारख्या मुद्यांमुळे प्रभागरचनेला वारंवार उशीर होत होता. त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी अस्वस्थता होती. मात्र निवडणूक आयोगाने अखेर प्रभागरचना आणि आरक्षण सोडतीबाबत निर्णय घेतला आहे. सुरुवातीला प्रभागरचना केली जाणार असून त्यानंतर राज्य मागासवर्ग आयोगाचा आदेश तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेतला जाणार आहे.

आयोगाच्या आदेशानुसार आता प्रभागरचना अंतिम करण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सन 2022 ची सार्वत्रिक निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार असून त्याबाबतचा प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा महापालिका प्रशासनाने 13 जानेवारी 2022 रोजी आयोगाला सादर केला होता. शुक्रवार (दि. 27) रोजी प्रभागरचनेच्या प्रारुप आराखड्याबाबत महापालिकेला आदेश मिळाले होते. तर मंगळवारी सकाळी प्रभागरचनेच्या तारखांचे आदेश प्राप्त झाले आहेत.

46 प्रभागांतून होणार 139 नगरसेवक

शहरामध्ये एकूण 139 जागांसाठी एकूण 46 प्रभाग होणार आहेत. त्यात 1 प्रभाग 4 सदस्यांचा असणार आहे. सन 2011 च्या 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्येनुसार शहरात एकूण 3 हजार 102 गटानुसार (ब्लॉक) रचना केली आहे. एका प्रभागात सरासरी 37 हजार लोकसंख्या असणार आहे. शहरातील नगरसेवक व इच्छुकांना आपला प्रभाग कोणता, हे समजण्यासाठी दोन दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. मंगळवारी (दि. 1) प्रभागारचनेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post