24 जानेवारी नंतर या ठिकाणी वाहने पार्क केल्यास कायदेशीर कारवाई

 


प्रेस मीडिया :

कराड नजीक पुणे-बंगळुरू महामार्गावरील सर्व्हिस रोडवर पार्किंग केलेल्या वाहनांमुळे, वाहतूक ठप्प, छोटे-मोठे अपघात, वादावादीचे प्रसंग होत आहेत. त्यामुळे कराड शहर राष्ट्रीय महामार्गलगतच्या कोल्हापूर नाका ते गंधर्व हॉटेल व कोयना वसाहत ते कोल्हापूर नाका या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर लावण्यात येणारी वाहने सर्व्हिस रोडवर पार्क करू नयेत, असे आवाहन कराड शहर पोलीस ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा कराड शहर व मलकापूर नगरपालिका यांच्या वतीने करण्यात आले आहे.24 जानेवारीनंतर या ठिकाणी वाहने पार्क केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मलकापूर नगरपालिका हद्दीत कोल्हापूर नाका ते गंधर्व हॉटेल व कोयना वसाहत ते कोल्हापूर नाका अशा दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर हॉटेल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, बँका, मंगल कार्यालये, गॅरेज आणि इतर आस्थापना आहेत. त्यापैकी कराड व आजूबाजूच्या परिसरातून तातडीचे वैद्यकीय उपचारकामी आवश्यक असणारे पेशंट येत असतात. काही वेळेला सर्व्हिस रोडवरील वाहतूककोंडीमुळे अत्यावस्थ रुग्णांना उपचार मिळण्यास विलंब होतो, असे निदर्शनास आले आहे.

कराड शहर ही मोठी बाजारपेठ असल्याने दोन्ही सर्व्हिस रोडवर कराडमध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात आहे. वाहनधारक आपली वाहने सर्व्हिस रोडवरच जागा मिळेल तिथे पार्क करून जातात. त्यामुळे दोन्ही सर्व्हिस रोडवर वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पार्ंकग केलेल्या वाहनांमुळे त्याठिकाणी वाहतूककोंडीत छोटे-मोठे अपघात होऊन वादावादीचे प्रसंग होत आहेत. या सर्व्हिस रोडवरील काही गॅरेजमालक त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेली वाहने रोडवरच उभी करून दुरुस्ती करीत असतात. त्यामुळेही वाहतूककोंडी होत आहे.

गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 लगत सर्व्हिस रोडवर लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. पार्किंग केलेल्या वाहनांच्या आडोशाला व्यसनांचे अड्डे, अपघातास निमंत्रण, गाडय़ा, डिझेल, मालचोरी घटना घडताहेत. पार्ंकग केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन सामान्य जनतेस नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशा भावना व्यक्त होत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post