स्पर्धा परीक्षा म्हणजे काय.. ?

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  गणेश राऊळ : 

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ? अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC . तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात  दिली जाते.  या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात.या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या  सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात!

शासनाच्या प्रत्येक विभागातील पदभरती साठी त्या त्या विभागात अशा स्वरूपांच्या स्पर्धा परीक्षा होत असतातच,


*त्यापैकी काही मुख्य स्पर्धा परीक्षा  :-*

1. युपीएससी

2. एमपीएससी

3. स्टाफ सिलेक्शन 

4. बँकिंग

5. रेल्वे

6. पोस्ट

7. संरक्षण दल

8. एलआयसी, इत्यादी. 

 

अनेकदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे विद्यार्थी दिसून येतात :-*

1. ज्यांना आयएएस-आयपीएस व्हायचे असते, त्यासाठी यूपीएससीचे प्रयत्नसुद्धा सुरू असतात; पण एमपीएससीच्या विविध परीक्षांबाबत त्यांच्यात पूर्ण निरुत्साह दिसून येतो. बऱ्याचदा या परीक्षांबाबत त्यांना नीटशी माहितीसुद्धा नसते, असे निदर्शनास येते. 

2. पीएसआय/ एसटीआयसारख्या परीक्षांमध्ये आम्हाला स्वारस्य नाही, मी फक्त यूपीएससी करतो अशा ताठय़ामध्ये वावरणारा एक वर्ग आहे.

3.  तर एमपीएससीच्या परीक्षेतून एखादे छोटे-मोठे पद मिळाले की पुरे झाले! यूपीएससीचे नंतर बघता येईल किंवा  ‘माझं ध्येय फौजदार होणे, इतर परीक्षांमध्ये मला स्वारस्य नाही,’ असे म्हणणारे उमेदवारही आहेत.

   महत्त्वाकांक्षा असणे वा ध्येयवादी असणे गैर बिल्कुल सुद्धा नाही, पण करिअरच्या वाटेवर नेमके काय साध्य करायचे आहे या विषयीची स्पष्टता व ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची साथ असणे आवश्यक आहे. अनेकवेळा एकाच परीक्षेचा ध्यास घेतल्याने उमेदवारांचे नुकसान होण्याची शक्यता असते. तीन चार  प्रयत्न संपले तरी ऐन उमेदीची चार पाच वर्ष निघून जातात.  म्हणून केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षांची नीट माहिती घेऊन उमेदवारांनी आपली योजना आखायला हवी.

         सर्वप्रथम, तयारी सुरू करताना नागरी सेवा परीक्षा, आयएएसचे ध्येय ठेवून अभ्यास सुरू केला पाहिजे. कारण नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास विस्तृत व व्यापक आहे.

      नागरी सेवा परीक्षा ही इतर सर्व परीक्षांमध्ये प्रमुख आणि काठिण्यपातळीत सर्वाधिक वरची मानली जाते. इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम यूपीएससीच्या जवळपास जाणारा असतो. हा अभ्यास चांगला झाला की इतर परीक्षांना तुम्ही सहज सामोरे जाऊ शकता. यूपीएससीची तयारी करताना सामान्य अध्ययनाचा पायाभूत अभ्यास चांगला झाल्यामुळे इतर परीक्षांना सामोरे जाण्यात विशेष अडचण येत नाही आणि नव्याने अभ्यासही करावा लागत नाही. इतर परीक्षांचा अभ्यासक्रम, परीक्षापद्धती, पॅटर्न यामध्ये काही अंशी फरक असतो, पण त्यासाठी तुम्हाला फार वेगळे आणि मोठे श्रम घ्यावे लागत नाहीत. या एका परीक्षेच्या अभ्यासामुळे एमपीएससी, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, रेल्वे, पोस्ट, संरक्षण दल, एलआयसी अशा विविध परीक्षांना बसणे सोपे जाते.  यासाठी थोडा कालावधी जरूर द्यावा लागेल. अगदी अशाच प्रकारे ज्यांचा एमपीएससी (राज्य सेवा परीक्षे ) चा अभ्यास परिपूर्ण असतो ते विद्यार्थी पोलीस भरती , तलाठी, लिपिक अशा सरळसेवा परीक्षा अगदी सहज उत्तीर्ण होताना दिसतात यामुळे खासमराठी वरील सर्व लेखांमध्ये आपण जास्तीत जास्त एमपीएससी ची तयारी करणार आहोत सोबत इतर परीक्षाचा देखील अभ्यास असेलच ! आता इथे एक गोष्ट विशेष करून लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे  राज्य लोकसेवा आयोगाकडून विविध सेवांसाठी परीक्षा घेतल्या जातात.  या सर्वच परीक्षा ‘एमपीएससीची परीक्षा’ याच नावाने ओळखल्या जातात.



Post a Comment

Previous Post Next Post