टीईटी' घोटाळ्याचे 'कनेक्‍शन' थेट मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्‍यता ..

पेपरफुटी प्रकरणानंतर येथील कारभाराचा बुरखा टराटरा फाटत चालला आहे.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

अनवरअली शेख : 

 पुणे- 'टीईटी'तील गैरव्यवहारांच्या अनेक सुरस कथा आता उघडकीस येत आहेत. तुकाराम सुपे आणि सुखदेव डेरे यांच्या अटकेनंतर आणखीही काही मोठी नावे समोर येण्याची चिन्हे आहेत.हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करत पारदर्शक कारभाराचा आव आणणाऱ्या परिषदेकडून आणला जात होता.मात्र, पेपरफुटी प्रकरणानंतर येथील कारभाराचा बुरखा टराटरा फाटला आहे. दरम्यान, परिषदेतील सर्व आजी-माजी अधिकाऱ्यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

परीक्षा परिषद ही स्वायत्त संस्था असल्याने तेथे मनमानी कारभार वर्षानुवर्षे सुरू आहे. परिषदेकडून विविध परीक्षा घेण्यात येतात. निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंपन्यांना कोट्यवधी रुपयांच्या कामाचा ठेका देण्यात येतो. या कंपन्यांच्या कामकाजावर व्यवस्थित नियंत्रण न ठेवल्याने आता विविध घोटाळे समोर येऊ लागले आहेत.

परिषदेला प्रामुख्याने टीईटी, टायपिंग या दोन परीक्षांमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा फायदा होतो. विविध परीक्षांच्या शुल्काच्या माध्यमातून परिषदेने विविध बॅंकामध्ये सुमारे 250 कोटी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. त्याच्या व्याजावरच परिषदेचा खर्च भागवला जात आहे.

दरम्यान, 'टीईटी' घोटाळ्याचे 'कनेक्‍शन' थेट मंत्रालयापर्यंत पोहोचण्याची शक्‍यता असून यात मंत्रालयातील काही बडे अधिकारीही गोत्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

फ्लॅट, गाड्या, जमिनी, बंगले…

परिषदेतील काही अधिकाऱ्यांनी फ्लॅट, गाड्या, जमिनी, बंगले अशी मालमत्ता जमविली आहे. उत्पन्न स्रोतापेक्षा ही मालमत्ता अधिक असून या बेहिशेबी मालमत्तेची कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी 'टीईटी' दिलेल्या उमेदवारांकडून करण्यात येत आहे. काही अधिकाऱ्यांनी स्पॉन्सरशिप घेऊन विमान वारी, पर्यटन स्थळाच्या सहली, परदेश वारीही केली असून हा संशोधनाचा विषय बनला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post