राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर थेट जनतेसमोर त्याचे कारण द्यावे लागेल.

राजकीय पक्षांची यामुळे चांगलीच कोंडी होण्याची शक्यता


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 एखाद्या राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली तर थेट जनतेसमोर त्याचे कारण द्यावे लागेल. हाच उमेदवार का निवडला हे जनतेला सांगावे लागेल, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी दिली.निवडणुकीत आपण ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे त्याच्याबाबत मतदारांना संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. ही जबाबदारी अर्थातच संबंधित राजकीय पक्षाची राहणार आहे. एखाद्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल, त्याच्यावर काही गुन्हे दाखल असतील तर त्याचा तपशील वर्तमानपत्र, टीव्ही, वेबसाइट अशा माध्यमातून जाहीर करावा लागेल. त्याचवेळी स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला उमेदवारी न देता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीलाच का उमेदवारी दिली, हे सुद्धा संबंधित राजकीय पक्षांना स्पष्ट करावे लागेल, असे सुशील चंद्रा यांनी म्हटले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राजकारणातील गुन्हेगारी रोखण्यासाठी हे मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास त्यामागचे कारणही जनतेला सांगावे लागणार असल्याने राजकीय पक्षांची यामुळे चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post