अत्तर व्यापाऱ्याच्या घरात सापडलेले पैशांचे घबाड. ते शोधण्यासाठी आणि मोजण्यासाठी अधिकाऱ्यांची तारांबळ

पियूष जैन नेमका कोण आहे, त्याचा इतिहास काय आहे...

प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 नवी दिल्ली - संपूर्ण देशात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे अत्तर व्यापाऱ्याच्या घरात सापडलेले पैशांचे घबाड. ते शोधण्यासाठी आणि मोजण्यासाठी अधिकाऱ्यांची तारांबळ.

तसेच, हे पैसे सुरक्षित बँकेत नेण्यासाठीची कसरत. मात्र, या सर्व चर्चा झडत असताना हा अत्तर व्यापारी पियूष जैन नेमका कोण आहे, त्याचा इतिहास काय आहे, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

गुजरातमध्ये पकडलेल्या ट्रकमध्ये सापडलेल्या बनावट ई-वे बिल आणि बनावट पावत्यांमुळे अत्तर व्यापारी पीयूष जैन आणि शिखर पान मसाल्याचा माल वाहतूकदार प्रवीण जैन यांच्यातील संबंध उघड झाले आहेत. मालाचा ट्रक पकडल्यानंतर डीजीजीआय टीमने बराच वेळ शोध घेतला. प्रथम शिखर पान मसाला आणि वाहतूकदाराच्या ठिकाणी छापा टाकला. तेव्हा त्यांच्याकडे पैशाचे प्रचंड मोठे घबाड सापडले, तसेच येथून पियुष जैन यांच्या नावाने अनेक बनावट बिले सापडली. त्यातच पियुष हा निशाण्यावर आला.

अधिकाऱ्यांनी 17 मशीनद्वारे पैसे मोजले. पैसे ठेवण्यासाठी 80 स्टीलचे बॉक्स आणावे लागले. तसेच, त्याच्या वाहतुकीसाठी कंटेनर मागविण्यात आला. अखेर ही रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. तपासानंतर व्यवसायाची व्याप्ती कळेल. या छाप्यात सुमारे 171 कोटींहून अधिक रोकड मिळाल्यानंतर, अत्तर व्यापारी पीयूष जैन शिखर पान मसालाचे मालक आणि वाहतूकदार प्रवीण जैन यांच्यात आणखी चौकशी होऊ शकते. अत्तर व्यापाऱ्याचा व्यवसाय परदेशात पसरला आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी आयकर आणि ईडीची चौकशी सुरू झाल्यावर विदेशी व्यवहार, बँक लॉकर्स, मालमत्ता उघडकीस येतील. एकेकाळी शिखर पान मसाल्याचा शहरात मोठा व्यवसाय होता. काम वाढल्यानंतर नोएडा येथे स्थलांतरित झाले परंतु तरीही शहरात मोठ्या प्रमाणावर व्यवसाय सुरू आहे.

कन्नौजमधील कारवाई दरम्यान त्याच्या घरातून सापडलेल्या डायरीतही या दोघांच्या नावांसह त्यांचे व्यवहार, वस्तूंचा पुरवठा आदींचाही उल्लेख आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये ट्रक पकडल्यानंतर हा माल इतरत्र दाखवून प्रत्यक्षात अन्यत्र जात असल्याचे आढळून आले. यानंतर डीजीजीआय टीमने निरीक्षण सुरू केले. सर्व पुरावे गोळा करून कारवाई करण्यात आली. मात्र, एवढी मोठी रोकड मिळाल्याने अधिकारीही हैराण झाले आहेत. बहुतांश व्यवसाय रोखीने होत असल्याचे तपासात समोर आले आहे. विविध ठिकाणी जाणाऱ्या मालावरही कमिशन आकारले जात होते.

यापूर्वी ट्रान्सपोर्टर प्रवीण जैन त्याच्या साथीदारांवर ऑगस्टमध्ये राज्य जीएसटी अधिकाऱ्यांवर गोळीबार करून सुपारीचा ट्रक सोडल्याचा आरोप होता. राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी फतेहपूरमध्ये अहवालही दाखल केला होता. तसेच आयकर, जीएसटी, कस्टमच्या अधिकाऱ्यांनीही डीजीजीआयच्या कारवाईत सहकार्य केले. मात्र, अद्याप प्राप्तिकराचा तपास सुरू झालेला नाही. डीजीजीआयची कारवाई संपल्यानंतर, आयकर आणि ईडी त्याची चौकशी सुरू करू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post