वक्फ बोर्ड घोटाळय़ाशी आमचा नाही, तर भाजप नेत्यांचा थेट संबंध.. नवाब मलिक



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर सात ठिकाणी छापा मारला. आता मलिक यांच्या घरावर छापा पडणार अशा खोटय़ा बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. वक्फ बोर्ड घोटाळय़ाशी आमचा नाही, तर भाजप नेत्यांचा थेट संबंध असून पुढील आठवडय़ात पर्दाफाश करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी आज दिला.मी वक्फ बोर्डाची जमीन हडप केली असे भाजप नेते किरीट सोमय्या सांगत आहेत. मी जमीन हडप केलेली नाही. मात्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमिनी लाटणाऱया भाजप नेत्यांना सोडणार नाही. आगामी काळात पुण्यातील वक्फची जमीन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना अटक होईलच. या नेत्यांना ईडी बोलावते का हे देखील पाहणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.

आमच्या एका अधिकाऱयाला ईडीचे अधिकारी दोन दिवस बोलावून तुम्ही एण्डोमेंट बोर्डाचा चुकीचा एफआयआर दाखल केलात. काय गरज होती, अशी विचारणा करत आहेत. ज्या लोकांनी सात कोटी रुपये लुटले त्यांची शिफारस करण्याचे काम ईडीचे अधिकारी करत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

ईडीने सोमय्या यांना प्रवक्ता म्हणून नियुक्त केलंय का ?

वक्फ घोटाळा प्रकरणात चौकशी होणार, चोरी केलेला माल आम्ही जप्त करणार, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून केला जात आहे. वक्फ प्रकरणात ईडीचे अधिकारी मलिक यांच्या घरी येणार आणि त्यांना अटक होणार असल्याचे ते माध्यमांत सांगत आहेत. ईडीने सोमय्या यांना अधिकृत प्रवक्ते म्हणून नियुक्त केले आहे का, अशी विचारणा मलिक यांनी केली. ईडीलाही एका चांगल्या प्रवक्त्याची गरज असून सोमय्या यांना ईडीचा प्रवक्ता म्हणून पत्र द्यावे. निदान त्यांना पगार तरी सुरू होईल, असा टोला लगावला. तसेच खासदार असताना बोगस बिलांद्वारे पैसे उकळले, त्याचीही माहिती बाहेर काढणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

ईडीने प्रेस नोट काढून माहिती द्यावी

वक्फ बोर्डाबाबत कोणती केस नोंदविण्यात आली? त्यात काय प्रगती झाली? त्यात कोण आरोपी होऊ शकतात? याची रीतसर माहिती ईडीने प्रेसनोट काढून द्यावी. तुम्हाला जी काही कारवाई करायची ती करा, पण बातमी पेरण्याचे काम बंद करा, असे मलिक म्हणाले.

चार्जशीट सोमय्यांकडे कशी? भावना गवळी यांचा सवाल

किरीट सोमय्या करत असलेले आरोप खोटे आहेत. माझ्याविरोधात चार्जशीट दाखल झाली असेल तर अजूनपर्यंत ती आमच्या वकिलांना मिळालेली नाही. मग यांच्याकडे कशी आली, असा सवाल खासदार भावना गवळी यांनी केला

Post a Comment

Previous Post Next Post