काबाडकाष्टाचं जीणं अन् सुखाच्या आनंदाचं गाणं...!

 काबाडकाष्टाचं जीणं अन्

सुखाच्या आनंदाचं गाणं...!


गर्द काळोख रात्रीला मुश्किलीनं दूर सारुन सूर्य सा-या चराचराला तेजस्वी किरणांनी उजळून टाकतो...

खरंतर त्याच्या उजेडाच्या उत्साहानं स्वप्न साकारण्याची मोठी आशा बाळगत दिवसाचं जगणंही सुरु होतं...त्याची ही जगण्याची रितच निसर्गातल्या संपूर्ण प्राणीमात्रांना देखील लागू पडत असते...पण ,त्याची जाणीव व्हायला देखील काही काळ कठीण प्रसंगांचा ,आपल्या संयमाची परिक्षा घेण्याचा ,डोळ्यातल्या अश्रूंना आनंदात रुपांतरित करण्याचा ,सुख - दु:खातलं शाश्वत समजण्याचा ,सा-यात गुंतून पुन्हा अलिप्त होण्याचा ,यशानं हुरळून न जाणं किंवा पराभवानं खचून न जाण्याचा ,दुस-यांच्या सुखासाठी झटण्याचा ,निरपेक्ष भावनेनं चांगलं देत राहण्याचा अशा विविध रुपानं यावा ,हा जणू जगण्याचा अलिखित नियमच असावा...कारण ,यातील कोणतीच गोष्ट माणूस टाळू शकत नाही ,म्हणूनच कदाचित तो भल्या - बु-या अनुभवांनी परिपूर्ण आयुष्य जगण्याच्या प्रक्रियेचा अविभाज्य अंग बनतो...

भलेजरी आजचा काळ दु:खाच्या धगीनं होरपळणारा ,काळोखानं झाकोळून जाणारा असला तरी त्यालाही काळाचं बंधन ,मर्यादा आहेतच की ! परिवर्तन हा जगाचा नियम त्याला कसा काय अपवाद ठरु शकेल...? कारण ,तो देखील निसर्गाच्या अस्तित्वाचेच एक महत्वपूर्ण अंग आहे...हे सारं आयुष्याचं गणित ,जगण्याचं मर्म 

पोटाची खळगी भरण्यासाठी संसाराचं बि-हाड पाठीवर घेवून मैलोनमैल भटकंती करणा-या आपल्या बांधवांना चांगलंच उमजलं असावं...कारण ,त्यांची जगण्यातल्या अडचणी ,समस्या किंवा दु:खाबाबत कधीच कसली तक्रार नसते...हरघडीला हातचा क्षण परिपूर्ण जगणं ,स्वतःबरोबर इतरांना देखील जपणं ,मिळेल ती भाजीभाकर खावून सुखा - समाधानानं जगत त्याचाही आनंदाचा उत्सव करणं , हेच जणू  त्यांना आयुष्याच्या शाळेतील परीक्षेनं शिकवलेलं असतं...यासाठी त्यांचा अनुभवाच्या अभ्यासाचा सराव कायम सुरुच असतो...

आज सकाळी सूर्य उजाडून त्याची तेजस्वी किरणे ऊस तोड मजूरांच्या झोपड्यांमध्ये हस-या चेह-यांनी आनंदात बागडत होती...तसं या मजूरांची कामावर जाण्यासाठी आवराआवरची मोठी धांदल उडाली होती...यामध्ये मजूर आया - बहिणी विटा - दगडांनी बनवलेल्या चुलीवर भाकरी ,कालवण ,भात अशा स्वयंपाकाबरोबरच धुणी - भांडी करण्याच्या कामात गुंतल्या होत्या...यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं अपार समाधान हे काबाडकष्टातून ,कष्टाचं मोल जपण्यातून आयुष्याला लाभलेल्या

सुखाच्या आनंदाची प्रचिती देत होतं...एकीकडे सूर्य उजाडून तो आपल्या किरणांनी

निसर्गातल्या चराचराला उजळून टाकत असतानाच दुसरीकडे ऊसतोड मजूरांच्या झोपड्यांमधील हास्याचा ,आनंदाचा किलबिलाट दु:खाच्या काळोखातील अडचणी ,समस्यांशी दोन हात करण्यासाठी आता आम्ही कष्टाच्या तयारीनिशी सज्ज असल्याचा संदेश देत होता...!


- सागर बाणदार


कविता .....

साधी दु:खाची झळही बसू नये

इतकी तुझ्या प्रेमाची अगाध ताकद ,

पण ,आताशा तुझ्या डोळ्यातील पाणी

माझ्या मनाला करतं पुरतं गारद !


आई ,तुझं ममत्व म्हणजे

जणू साक्षात देवत्वाचं प्रकटणं ,

असं सारं सुखाचा लाभता

नाही उरत काही उणं !


आज असं काय घडलं ?

डोळ्यात यावं कधीचं पाणी ,

पण ,मीच होवूनी तुझी आई

पुसून टाकेन वेदनांची कहाणी !


तू सारं निमूट सोसावं

आता हे नाही चालायचं ,

तुझीच शिकवण येई कामी

दु:खाशी दोन हात करायचं !


तुझ्या पाणावल्या डोळ्यांच्या कडा

कधीच लपवता नाही यायच्या ,

पण ,थकलेल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या

माझ्यावरील प्रेमाखातर हास्यानं फुलायच्या !


जगण्याच्या या होरपळणाऱ्या उन्हात

तुझ्याच प्रेमाची भरवशाची सावली ,

म्हणून ,तू आहेस माझ्यासाठी

देवत्व लाभलेली थोर माऊली !


- सागर बाणदार



Post a Comment

Previous Post Next Post