स्थायी समिती सभेतील निर्णय प्रक्रियेत नगराध्यक्षांच्या पतीसह काहींचा हस्तक्षेप : नगरसेवक शशांक बावचकर



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

इचलकरंजी नगरपालिकेत महिला आरक्षण, अधिकार आणि समान धोरणांना तिलांजली देत स्थायी समितीच्या सभेत नगराध्यक्षांच्या पतीसह काहींनी निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याने लोकशाहीला काळीमा फासला गेला असल्याचा आरोप काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी करुन या सभेबद्दल जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले इचलकरंजी नगरपालिकेत विविध महत्वपूर्ण आर्थिक विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी सोमवारी स्थायी समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये स्थायी समितीच्या अध्यक्षा तथा नगराध्यक्षा तसेच काही महिला सदस्यांच्या  पतींनी सभागृहात उपस्थित राहून निर्णय प्रक्रियेत सहभाग घेतला. या प्रकाराचा काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर तीव्र शब्दात निषेध केला आहे. 

या बाबत नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत आर्थिक स्वरुपाचे महत्वाचे विषय असताना बैठकीस पदाधिकार्‍यांचे पतीराज निर्णय घेण्यासाठी उपस्थित होते की काय अशी शंका येत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभारात पतीदेवांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होऊ लागल्याने राज्य शासनाने निर्णय प्रक्रियेत महिला सदस्यांच्या पतींचा हस्तक्षेप होत असेल तर संबंधित सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची भूमिका घेत तसा कायदाही केला. परंतु इचलकरंजी नगरपालिकेत सातत्याने कामकाजात महिला सदस्यांच्या

पतीदेवांचा हस्तक्षेप केला जात आहे. स्थायी समिती सभेत पतीदेव खूर्चीमागे बसून निर्णय करत असतील तर तो लोकशाहीला काळीमा फासणारा प्रकार आहे. लोकशाहीत महिलांना आरक्षण, अधिकारी व समान धोरण भूमिका अवलंबिले असताना त्यालाही काळीमा फासली जात आहे. त्यामुळे स्थायी सभेत बाहेरच्या व्यक्तींनी उपस्थित राहून हस्तक्षेप केल्याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो. तसेच या सभेच्या कामकाजाबद्दल जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करणार असल्याचेही नगरसेवक शशांक बावचकर यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post