मराठी साहित्य संस्कृतीला उज्ज्वल परंपरा- लोकनेते रामशेठ ठाकूर



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी सुनील पाटील.

मराठी साहित्य संस्कृतीला उज्ज्वल परंपरा असून दिवाळी अंक यातील एक महत्वाचा भाग आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आज (दि. ०२) येथे केले. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर संपादित 'दैनिक किल्ले रायगड' च्या ५५ व्या, अविनाश कोळी संपादित 'सा. हक्काचे व्यासपीठ' च्या  ७ व्या आणि अनिल राय संपादित सा. स्टार पनवेलच्या ५ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. 

     पुढे बोलताना त्यांनी म्हंटले कि, मराठी साहित्याचे क्षेत्र हे भव्य आणि दिव्य आहे. या साहित्याला इसवी सनाच्या बाराव्या शतकापासून, म्हणजे सुमारे साडेआठशे वर्षांची परंपरा आहे. संतसाहित्य, पंतसाहित्य, तंतसाहित्य, इंग्रजी आमदानीतील मराठी साहित्य, स्वातंत्र्यपूर्व साहित्य, स्वातंत्र्योत्तर साहित्य, आधुनिक साहित्य, साठोत्तरी साहित्य, १९९० नंतरचे साहित्य असे परिणामकारक टप्पे आहेत. काव्य, कादंबरी, कथा, लेख, नाटक इत्यादी अनेकानेक साहित्यप्रकार हे मराठी साहित्यात संपन्नतेने हाताळले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने विविध माहितीने नटलेला दिवाळी विशेषांक हा साहित्य संस्कृतीतीमधील अनमोल ठेवा आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. दैनिक किल्ले रायगडचा दिवाळी विशेषांक दरवर्षी वजनदार लेखकांच्या लेखणीतून सादर होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तर हक्काचं व्यासपीठ अंकाने आरोग्यम धनसंपदा हा मुलमंत्र जपत आरोग्य विषयक सखोल माहिती प्रसिद्ध करत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली असल्याचा आवर्जून उल्लेख केला. स्टार पनवेल अंकाने दिवाळी सणाचे महत्व अंकात विशद केला, असल्याचे सांगून या दिवाळी अंकांनी समाजात उपयुक्त माहिती देण्याबरोबरच साहित्य संस्कृती जपली आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले. 

       या प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिद्ध गझलकार ए. के. शेख, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, गणेश कोळी, रत्नाकर पाटील, दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर, प्रदीप वालेकर, सा. हक्काचं व्यासपीठचे संपादक अविनाश कोळी, स्टार पनवेलचे संपादक अनिल राय, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, विवेक पाटील, मंदार दोंदे, हरेश साठे, विशाल सावंत, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, अनिस मणियार, राज भंडारी, विशाल सावंत, छायाचित्रकार लक्ष्मण ठाकूर, प्रविण मोहोकर, कोमल कोळी, विकास पाटील, विकास घरत, सुमेधा लिम्हण आदी पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post