विशेष वृत्त : परीक्षा विभागाच्या कर्मचा-यांची अग्नी परीक्षा......

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली शेख :

पुणे : गेले दोन दिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या प्रवेशद्वाराजवळ एका चित्रपटाच्या शूटिंगचा व मेकअप चा सेट उभारला आहे .परीक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांची पार्किंगची जागा या स्टुडिओस  दिली  आहे .       


परीक्षा भवन च्या आजूबाजूचा अर्धा किलोमीटरचा परिसर हा या शूटिंगच्या व्हॅनिटी व्हॅन, कलाकारांच्या  चार चाकी गाड्या, जेवणाचे तंबू ,चहाचा टी स्टॉल यांनी व्यापला आहे .त्यामुळे परीक्षा विभागातील कर्मचारी, येणारे विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, महाविद्यालयाचे सेवक यांना परीक्षा विभागात प्रवेश करण्यापूर्वी अर्धा किलोमीटर अंतरावर कोठेतरी आपली वाहने पार्क करून परीक्षा  विभागात चालत यावे लागते. कर्मचाऱ्यांची सकाळची हजेरीपत्रक गाठण्याची धावपळ होत आहे .परीक्षा भवनाची इमारत पाच मजली आहे. या इमारतीमध्ये किमान अडीचशे कर्मचारी काम करतात. यामध्ये पन्नास वर्षाच्या पुढील वयोवृद्ध कर्मचारी बरेच आहेत. या परीक्षा भवनला लिफ्ट नसल्याने शारीरिक दमछाक होते .या विभागात अंध ,अपंग विद्यार्थ्यांची रोज ये-जा असते .परीक्षा विभागाच्या आजूबाजूला रस्त्यावर शूटिंगच्या गाड्या उभ्या असल्याने रस्ता अरुंद झाला आहे 




शूटिंगच्या गर्दीतून वाट काढत कर्मचारी, विद्यार्थी-पालक, महाविद्यालयाचे कर्मचारी यांना जावे लागते .या शूटिंग मधील कलाकार मास्क घालत नसल्याने जीव मुठीत घेऊन चालावे लागते .परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना सकाळी दहा मिनिटे जरी उशीर झाला, तर त्यांच्या वेतनातून कपात होते. हजेरीपत्रकावरील स्वाक्षरीसाठी तांबड्या रंगाच्या रेघा मारणारे अधिकारी याबाबत संवेदनशील नाही.विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल तीन महिन्यापूर्वी जाहीर झाले असले ,तरी अद्याप ८0 हजार विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व उत्तीर्ण प्रमाणपत्र छपाई न झाल्याने विद्यार्थी ,महाविद्यालय ,परीक्षा विभागामध्ये गर्दी करीत आहेत .त्यांना पुढील शिक्षण व नोकरी करिता अडचणी येत आहेत. परीक्षा विभागातील कर्मचारी या विद्यार्थ्यांना उत्तरे देऊन हैराण झाले आहेत. कर्मचारी आता कोरोना परत येतो की काय ? यामुळे धास्तावले आहेत .आता बिचार-या परीक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांची परीक्षा सुरू झाली आहे.येत्या शुक्रवार शनिवार व रविवार या दिवशी विद्यापीठास शासकीय सुट्टी आहे त्या दिवशी जर हा चित्रपटाचा चित्रीकरणाचा प्रयोग झाला असता तर सर्वांना सुखकर झाले असते विद्यापीठ प्रशासन व व्यवस्थापन या अशा परीक्षेत कायम नापास होत आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post