पुणे महानगरपालिका निवडणूक : आरक्षण, प्रभाग रचना जाहीर होत नसल्याने गोंधळाची स्थिती.


 कोणत्या पक्षाचे तिकीट मिळवायचे ? याचे  नियोजन करता येत नसल्याने सर्व काही तळ्यात-मळ्यातच ...


प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली शेख : 

पुणे महानगरपालिका निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर आली असली तरी आरक्षण, प्रभाग रचना जाहीर होत नसल्याने आजी-माजी नगरसेवकांसह 'इच्छुक' उमेदवारांना कोणत्या पक्षाचे तिकीट मिळवायचे ? याचे  नियोजन करता येत नसल्याने सर्व काही तळ्यात-मळ्यातच असून निवडणूक आयोगाच्या परिपत्रकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मुख्य राजकीय पक्षांसह छोट्या-मोठ्या पक्षांसह अपक्षांनीही तयारी केली आहे. परंतु, निवडणूक प्रक्रिया अद्यापही आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या निर्णयातच अडकली आहे. मात्र, निवडणूक लढवायचीच, यावर ठाम असलेल्यांनी तिकिटासाठी 'गॉडफादर'कडे मोर्चेबांधणीपासून अगदी प्रचार फेरीपर्यंतची तयारही पूर्ण करून ठेवली आहे, अशा उमेदवारांची संख्या मोठी असून दिवाळी पासूनच अनेकांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी फराळ, स्नेहमेळावा या सह विविध कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

परंतु, गेल्या महिन्यापासून या सर्व गोष्टींच्या चर्चा असल्या तरी निवडणुकीच्या तारखा व प्रभाग जाहीर होत नसल्याने निवडणुका पुढे जाणार की वेळेत होणार, याबाबत संभ्रम असल्याने काहींनी हात आखडते घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम, प्रभाग रचना व तारखा जाहीर करीत नसल्याने काही नवीन चेहरे पुन्हा गायब होऊ लागले आहेत. त्यामुळे प्रभाग व तारखा जाहीर होत नाहीत तोपर्यंत राजकीय पक्षांसह अनेक 'इच्छुक' आपली भूमिका गुलदस्त्यातच ठेवणार असल्याचे स्पष्ट आहे.

'प्रथम नगरसेवक'चा मान…

कोणत्याही पक्षाचे लेबल नसलेले अनेक 'इच्छुक' आपण निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत असले तरी पडद्यामागून सूत्रे हलवून मिळेल त्या पक्षाकडून तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नात अशी मंडळी आहेत. आपल्या भागातून 'प्रथम नगरसेवक' होण्याचा मान आपल्यालाच मिळाला पाहिजे, यासाठी अनेकांनी मनसुबे आखले आहेत. याच कारणातून काही राजकीय पक्षाकडून अशा 'इच्छुकां'ना हाताशी धरून विविध कार्यक्रमांवर मोठा खर्च करण्यास सांगत आहेत.

ढोबळ रचनेवर प्रचार सुरू…

सर्वच पक्षांचे 'इच्छुक' उघडपणे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. फुरसुंगी गावचा एक स्वतंत्र प्रभाग व उरुळी देवाची, हांडेवाडी, होळकरवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी या गावांचा एक प्रभाग होणार अशी चर्चा सुरू असल्याने अनेकांनी ढोबळ रचना करून प्रचाराने कामही सुरू केले आहे.

राजकीय पक्षांची भूमिका…

या गावांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे चांगले प्राबल्य असले तरी भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेसनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तर मनसेही आपली ताकद आजमावू शकते. महाविकास आघाडी की स्वबळ याबाबत कोणता निर्णय होतो, यावरही बरेच काही अवलंबून आहे. याच कारणातून अनेक जण अपक्ष लढण्याच्याही तयारीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post