रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणाच गॅसवर...



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

रुग्णालयांमधील आगीच्या घटनांनंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या 'स्टेट ऑक्सिजन ऑडिट कमिटी'ने राज्यातल्या सुमारे 3 हजार 700 सरकारी, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन यंत्रणेचे ऑडिट केले.या मध्ये ऑक्सिजनच्या साठय़ाजवळ जनरेटर यंत्रणा, तांत्रिक कर्मचाऱयांचा व सुरक्षा विषयक उपाय योजनांचा त्याच बरोबर ऑक्सिजन गळती शोधणाऱ्या उपकरणांचा अभाव असे विविध धक्कादायक प्रकार आढळून आले आहेत.

कोरोनामुळे ऑक्सिजनची गरज वाढत आहे. त्यातून अनेक दुर्घटना घडण्याचे प्रकार घडले आहेत. नाशिकमध्ये महापालिकेच्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले. इचलकरंजीत आयजीएम रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणाऱया हाईफ्लो मशीनला आग लागली होती. रुग्णालयातील आगीच्या घटनांनंतर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या 'स्टेट ऑक्सिजन ऑडिट कमिटी'चे नोडल ऑफिसर डॉ. प्रशांत ननावरे यांनी सादर केलेल्या अहवालात राज्यातल्या विविध रुग्णालयांमधील ऑक्सिजन यंत्रणेतील त्रुटींवर नेमके बोट ठेवले आहे.



ऑडिटमध्ये आढळलेल्या त्रुटी

  • ऑक्सिजनच्या साठय़ाजवळ विजेची उपकरणे आढळून आली. बॅटरी बँक विजेच्या वायर, केबल वगैरे ऑक्सिजनच्या साठय़ापासून दूर ठेवणे गरजेचे.
  • ऑक्सिजनचा साठा असलेल्या ठिकाणी वायुविजन (व्हेंलीटेलशन) ची गरज
  • ऑक्सिजन यंत्रणेच्या देखभालीसाठी तांत्रिक स्टाफची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती.
  • ऑक्सिजनच्या देखभालीसाठी वार्षिक देखभालीचे कंत्राटही केले नव्हते
  • देखभालीसाठी कोणतेही नियोजन नव्हते.
  • ऑक्सिजनचा साठा असलेल्या ठिकाणी अतिशय अस्वच्छ वातावरण आढळून आले
  • ऑक्सिजन सिलिंडर साठय़ाजवळ मलनिस्सारण प्रक्रिया प्लॉट आढळून आला
  • ऑक्सिजन रूममध्ये झाडे उगवलेली आढळली
  • ऑक्सिजन सिलिंडर हाताळण्यासाठी लोखंडी साखळ्यांचा अभाव
  • ऑक्सिजन सिलिंडर हाताळण्याऱया कर्मचाऱयांना प्रशिक्षणाची गरज
  • ऑक्सिजन साठय़ाच्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेऱयांचा अभाव
  • ऑक्सिजनचा दाब मोजल्याचे प्रमाणपत्र नव्हते
  • रिकामे व भरलेल्या सिलिंडरवर नोंद नव्हती
  • ऑक्सिजन भरलेल्या सिलिंडरवर व्हॉल्व्ह बसवलेले नव्हते
  • ऑक्सिजनचा प्रवाह कोणत्या दिशने वाहतो ते दर्शवणारा फलक नव्हता
  • ऑक्सिजन सिलिंडरचा साठा तळघरात
  • ऑक्सिजनची गळती शोधणाऱया विशिष्ट द्रव्याचा वापर नाही
  • ऑक्सिजन सिलिंडरचा साठा रुग्णालयातील सार्वजनिक ठिकाणी केल्याचे आढळून आले. जागेच्या अभावामुळे सिलिंडर रुग्णालयाच्या बाहेरच्या जागेत ठेवलेले आढळले.
  • इलेक्ट्रिक जनरेटरजवळ ऑक्सिजन सिलिंडरचा साठा
  • ऑक्सिजन पाइपलाइनवर प्रेशर गेजचा अभाव
  • ऑक्सिजनच्या पाइपवर कलर कोडिंगचा अभाव

Post a Comment

Previous Post Next Post