पंचगंगा नदी घाट परिसरात स्वच्छता मोहिम

 स्वयंसेवकांकडून तीन टन कचरा गोळा 




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी / प्रतिनिधी

येथील पंचगंगा नदी घाट परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी सुमारे तीन टन कचरा गोळा करण्यात आले. त्यामुळे नदी घाट परिसराने मोकळा श्वास घेतला असून याबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

येथील पंचगंगा नदी घाट परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. विविध ठिकाणी सडत चाललेले निर्माल्य, तुटलेल्या प्रतिमा, अन्नपदार्थ यासह महापुरातून वाहून आलेले चादरी, कपडे, नारळ, पूजेचे साहित्य आदींमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे पंचगंगा नदी काठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता नदी घाट स्वच्छ करण्याची जबाबदारी आपलीही आहे. त्यामुळे नदीची सेवा करण्याच्या दृष्टीने नदी घाटावर श्रमदानाची गरज आहे. तसेच पंचगंगा नदी आपली जीवनदायिनी असल्याने आपलीही जबाबदारी ओळखून या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले होते. 

या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे शंभरहून अधिक स्वयंसेवकांनी स्वच्छता अवजाऱ्यांसह उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.आज रविवारी सकाळी स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. दीड तासांच्या श्रमदानातून सुमारे तीन टन कचरा गोळा करत कचरा घंटागाडीमध्ये भरून पाठवण्यात आले. यासाठी स्वयंसेवक, घंटागाडी कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. तर सेवाभारतीने हातमोजे उपलब्ध करून दिले होते. तसेच यावेळी विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. त्यामुळे नदी घाट परिसराने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.



जगदीश अंगडी : कार्यकारी संपादक :

Post a Comment

Previous Post Next Post