जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी गणपतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यासाठी सहकार्य करा..माजी खास. राजू शेट्टी यांचे आवाहन

 





प्रेस मीडिया वृत्तसेवा : शिरोळ /प्रतिनिधी:

 नामदार राजेंद्र पाटील यांनी दिलेला शब्द पाळावा. सर्वपक्षीय कृती समितीमध्ये सहभागी होऊन गणपतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.

    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ तालुका सर्वपक्षीय समितीच्यावतीने गणपतराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गणपतराव पाटील यांच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. आज मजरेवाडी, अकिवाट, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, सैनिक टाकळी, टाकळीवाडी, जुने दानवाड, नवे दानवाड, दतवाड, घोसरवाड येथील ठराव धारकांच्या भेटी घेण्यात आल्या.

 मा. खा. राजू शेट्टी म्हणाले, गणपतराव पाटील यांनी तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारण्यासाठी गेल्या चार-पाच वर्षांमध्ये परिश्रम घेतले आहे. त्यात त्यांना यशही मोठ्या प्रमाणात आले आहे. गणपतराव पाटील यांच्या  ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी सर्वपक्षीय समितीच्या वतीने त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शासनाच्या माध्यमातून  मोठी संधी मिळाली आहे. त्यांनी या संधीचं सोनं करावं. सर्वांनी मिळून शिरोळ तालुक्याचा विकास करूया. पाच वर्षापूर्वी गणपतराव पाटील यांच्यासह अन्य प्रमुख मंडळींनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मदत केली होती. त्यावेळी त्यांनी गणपतराव पाटील यांना मदत करण्याचा शब्द दिला होता. त्यांनी तो शब्द पाळावा असे आवाहन मा. खा. राजू शेट्टी यांनी केले. 

यावेळी बोलताना गणपतराव पाटील म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी आपण दत्तच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या आहेत. प्रामुख्याने शिरोळ तालुक्यामध्ये हजारो एकर जमीन क्षारपड बनली आहे, ती सुधारण्यासाठी आपण गेल्या चार पाच वर्षापासून प्रयत्न केले. त्यात यश आले असल्याचे सांगून बँकेच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी आपण खास प्रयत्न करणार आहोत. यासाठी  आपणास विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, केडीसी बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, जि. प. सदस्य अशोकराव माने, राजवर्धन नाईक निंबाळकर,  डॉ. संजय पाटील, ॲडव्होकेट सुशांत पाटील, माजी जि. प. सदस्य महादेव धनवडे, सावकार मादनाईक, अनिलराव यादव,  चंगेजखान पठाण, धनाजीराव जगदाळे, शिवसेनेचे वैभव उगळे, पं. स. सदस्य सचिन शिंदे, राजगोंडा पाटील, विकास पाटील, सतीश मलमे, भैरव हंकारे, राजू पाटील जांभळीकर, शेखर पाटील, सर्जेराव शिंदे, अशोकराव कोळेकर, धनाजीराव पाटील नरदेकर, दरगु  गावडे,  संजय पाटील कोथळीकर, रणजीत पाटील यांच्यासह शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post