मुंबईसह राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार ,. विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांनी सुरू




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

मुंबईसह राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळेची घंटा वाजणार असून दीड वर्षानंतर प्रथमच वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळांनी सुरू केली आहे. सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी दररोज टप्प्याटप्प्यात विद्यार्थ्यांना बोलाविण्याचे काही शाळांनी ठरविले आहे.बऱ्याच शाळांनी तीन तासांचे नियोजन केले असून दिवसाच्या सुरुवातीला दहावीच्या विद्यार्थ्यांची शाळा होणार आहे. त्यानंतर नववी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना बोलाविण्याचा मुख्याध्यापकांचा विचार आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी पहिल्या आठवडय़ात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार नाही.

पहिल्या आठवडय़ात अभ्यास होणार नसला तरी अनेक शाळांनी पूर्व नियोजित सहामाही परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची तयारी असल्याचे शाळांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांनो, बिनधास्त शाळेत या

पालकांनी आपल्या पाल्याला मास्क व स्वच्छ रूमाल देऊन बिनधास्त शाळेत पाठवावे. शाळेतील प्रत्येक वर्गखोली स्वच्छ धुऊन पुसून सॅनिटायझर केलेली आहे. वॉशबेसिनमध्ये हॅण्डवॉश आहेत. फिजिकल डिस्टन्सवरच विद्यार्थी बसण्याची सोय आहे. वर्गात प्रवेश करताना फूट सॅनिटायझर मशीनद्वारे हात स्वच्छ करण्यात येतील. विद्यार्थ्यांना काहीही त्रास जाणवला तरी त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात येईल. त्याआधी पालकांना कल्पना दिली जाईल. महत्त्वाचे म्हणजे खासगी इंग्रजी शाळांमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांनी कोरोना प्रतिबंधक दोन्ही लसी घेतल्या आहेत.

संजय तायडे पाटील, संस्थापक, अध्यक्ष, इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन

पहिली ते सातवीच्या शिक्षकांनाही उपस्थितीची सक्ती

मुंबईसारख्या शहरात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू होणार असले तरी अनेक शाळांनी पहिली ते सातवीच्या शिक्षकांनाही शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. अनेक खासगी शाळांमध्ये पहिली ते सातवीचे ऑनलाइन वर्ग सुरू असताना या शिक्षकांना शाळेत का बोलाविण्यात येत आहे, असा सवाल शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केला आहे. शिक्षण विभागाने या शिक्षकांच्या उपस्थितीविषयी ठोस सूचना शाळांना जारी कराव्यात असेही त्यांनी सांगितले. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा घ्याव्यात की नाही तसेच त्या कधी घेण्यात याव्यात, याविषयीही शिक्षण विभागाने लेखी सूचना देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. शिक्षण विभागाने ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन वर्गही सुरू ठेवण्यास सांगितले आहे, मात्र काही खासगी शाळांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहावे यासाठी ऑनलाइन वर्ग बंद करणार असल्याचे पालकांना कळविले असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या

अकरावीची प्रवेशप्रक्रिया अद्याप संपलेली नाही. त्यामुळे अकरावीचे वर्ग सुरू झालेले नाहीत. बारावीच्या वर्गात शिकणारे अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये ये-जा करण्यासाठी लोकल सेवेचा वापर करतात. या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येण्यासाठी लोकल प्रवासाची परवानगी देण्यात यावी. त्यामुळे त्यांचा वेळही वाचेल आणि वाहतूककोंडीचा फटका त्यांना बसणार नाही, अशी मागणीही समोर येत आहे.

मुंबईतील अनेक खासगी शाळांचे सॅनिटायझेशन बाकी असून उद्या रविवारी सुट्टीच्या दिवशी मुख्याध्यापकांच्या देखरेखीखाली सॅनिटायझेशनसह वर्गांचे नियोजन, तासिकांचे वेळापत्रक ठरविण्यासाठी तसेच राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक नियमावलीनुसार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना सूचना देण्यासाठी शाळांमध्ये बैठका होणार आहेत. महामुंबई शिक्षण संस्था संघटनेचे विनय राऊत यांनी सांगितले, पालकांकडून विद्यार्थी उपस्थितीविषयी हमीपत्र लिहून घेत आहोत. सध्या तरी सर्व विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची तयारी असली तरी प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर किती विद्यार्थी येतात हे समजेल.

Post a Comment

Previous Post Next Post