पुणे : सोमवार पासून 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी मान्यता दिली



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे :  सोमवार पासून पुणे शहरातील 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शनिवारी मान्यता दिली आहे. त्यानुसार, महापालिकेकडून आदेश काढण्यात आले असून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी हे आदेश लागू असणार आहेत.

राज्यशासनाने मागील आठवडयात शहरी भागात 8 वी ते 12 चे वर्ग करोना प्रतिबंधात्मक नियम तसेच पालकांचे संमतीपत्रक घेऊन शाळा सुरू करण्यात मुभा दिली आहे. मात्र, त्याच वेळी हे अधिकार स्थानिक प्रशासनास दिले आहे. पुणे शहरात पाच महिन्यांपूर्वी करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर घातला होता. तर गणेशोत्सवानंतर शहरात करोनाची तिसरी लाट येईल अशी भिती व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात शहरातील रूग्णसंख्या कमालीची घटली असून लसीकरणही वेगाने सुरू आहे. त्यामुळे, रूग्न संख्या शहरात स्थिरावली आहे.त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार, शाळा सुरू करण्यासाठी पालकांकडून तयारी दर्शविली जात आहे तर काही पालकांकडून तिसऱ्या लाटेच्या भितीने दिवाळी पर्यंतची वाट पहावी अशी भूमिका घेतली जात होती. मात्र, अखेर पालिका प्रशासनाने सोमवार पासून शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मात्र, त्यासाठी राज्यशासनाने घालून दिलेल्या अटींचे शाळांना पालन करावे लागणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post