राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

कोल्हापूर : जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसला होता. राज्य सरकारनं त्यानंतर पंचनामे करुन मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं.राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरुन शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा यात्रा काढत शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उचलून धरला होता. आता राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील महापुग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीने नुकसान भरपाई दरामध्ये वाढ केलीय. फरकासह वाढीव नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बागायती पिकांसाठी आता प्रति गुंठा 150 रूपये, जिराईती साठी 100 तर बहुवार्षिक पिकांसाठी अडीचशे रुपये मिळणार आहेत. नुकसान भरपाईच्या वाढीव फरकाची 18 कोटी 57 लाखांची गरज असून ही रक्कम दोन दिवसात रक्कम प्रशासनाकडे वर्ग होणार असल्याचं कळतंय.

जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. दोन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत तटपुंजी असल्यानं राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमेचं आयोजन केलं होतं. आता एसडीआरएफकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या दरांवर राजू शेट्टी काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

कोल्हापुरात झालेला मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामूळे कोल्हापुरातील प्रमुख रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. 81 पैकी तब्बल 35 हून अधिक प्रभागातील रस्त्यांना पावसाच्या पाण्याचा फटका बसलाय. पापाची तिकटी,गंगावेश, बिंदू चौक अशा सर्वच भागात या दुर्दशा झालेल्या रस्त्यांचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागतोय. विशेष म्हणजे खराब झालेल्या अनेक भागातील रस्ते हे काही महिन्यापूर्वीच केले होते. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जावर देखील आता प्रश्नचिन्ह उभे राहिलय.

Post a Comment

Previous Post Next Post