अंकनाद पाढे स्पर्धेचे ६ सप्टेंबर रोजी मंत्रालयात पारितोषिक वितरण

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

पुणे : अंकनाद राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा (द्वितीय पर्व)चा पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता मंत्रालय मुंबई येथे मराठी भाषा,उद्योग आणि खनीकर्म मंत्री सुभाष देसाई,अभिनेत्री सौ.चिन्मयी सुमित यांच्या हस्ते होणार आहे.  

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्याना उत्तेजन देण्यासाठी,गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने,मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा.लि आणि राज्य मराठी विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय अंकनाद पाढे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.७ गटातील २१ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली असून त्यांना गौरविण्यात येणार आहे. 

 मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा.लि.चे संचालक मंदार नामजोशी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.जिल्हास्तरीय फेरीत राज्यभरातून १३८२ स्पर्धकांनी नोंदणी केली होती.

   मंदार नामजोशी म्हणाले,'अंकनाद पाढे स्पर्धेतून मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळेल,हा उद्देश होता.अंकनादच्या संगीतमय पाढ्यांमुळे मुलांचे पाढे सहज ऐकून लक्षात राहतात,आत्मसात होतात.त्याचे परीक्षण होणे गरजेचे आहे.त्यासाठी अंकनाद तर्फे पाढे स्पर्धा ही संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचे आयोजन केले होते.जिल्हा पातळी,राज्य पातळीवर स्पर्धा घेतली.ही स्पर्धा मराठी भाषेतून घेतली.सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्याना पाढे  स्पर्धा खुली होती.वर्षातून दोन वेळा याप्रमाणे सलग पाच वर्ष ही पाढे स्पर्धा घेतली जाणार आहे.

 यशस्वी विद्यार्थ्याना प्रत्येक गटात राज्य पातळीवर रुपये ११ हजार,७ हजार,५ हजार अशी पहिल्या ३ क्रमांकांना राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे ही  पारितोषिके म्हणून दिली जाणार आहेत.स्पर्धेतील विजेते,राज्य मराठी विकास संस्था आणि अंकनादचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.https://www.facebook.com/Aanknaad  या फेसबुक पेजवर  समारंभ लाईव्ह पाहता येईल. 



                                                                                                                                                        

Post a Comment

Previous Post Next Post