पुणे मनपा निवडणुक : पुण्यातही स्वबळाची तयारी करा ...राज ठाकरे.



प्रेस मीडिया वृत्तसेवा :


 महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुण्यात भाजपसोबत युती करायची की नाही, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही तसेच त्यासाठी भाजपाही इच्छुक असेल असे मनसे अध्यक्षांना वाटत नाही.दुसरीकडे या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपशी युती करावी, असा संदेश मनसेच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे. परंतु , आता हि चर्चा थांबवावी असा संदेश राज ठाकरे  यांनी पुण्यातील मनसेच्या नेत्यांना धाडल्याचे वृत्त आहे. तसेच पुण्यातही स्वबळाची तयारी करा असं देखील आवर्जून सांगितलं आहे.

तत्पूर्वी, राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही बाब राज ठाकरे यांच्या कानावरही घातली होती. परंतु, राज ठाकरे सध्या अत्यंत सावधपणाने पावले टाकताना दिसत आहेत.

मागील निवडणुकीत प्रभाग रचनेमुळे पक्षाचे नगरसेवक कमी झाले असं मनसे नेते सांगतात. मात्र, शहरातील पक्ष संघटनेचा प्रभावही कमी झाला होता. आगामी 2022 च्या महापालिका निवडणुकीत मनसे सर्व जागा लढवणार आहे. त्यातील 90 जागांवर मनसेनं लक्ष केंद्रीत केल्याचं सांगतानाच 45 जागा निवडून येणारच असा दावा मनसेचे नेते करत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post