अवघ्या 8 दिवसांत घटस्फोट मंजूर ..



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख

उच्चशिक्षित दाम्पत्यांचा घटस्फोट केवळ आठ दिवसांत मंजूर झाला आहे. वैचारिक मतभेदामुळे पटत नसल्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने दाखल केलेला अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एच. के. गणात्रा यांनी मंजूर केला. जानेवारी 2019 मध्ये दोघांचे लग्न झाले असून, जानेवारी 2020 पासून दोघे वेगळे राहत आहेत.

दावा दाखल केल्यापासून घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागत असतो. मात्र, दोघे सुमारे दीड वर्षांपासून विभक्‍त राहत आहेत. आता सहा माहिने थांबणे शक्‍य नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्याच्या आधारे वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. त्यानुसार हा निकाल झाला. आठ म्हणजे इतक्‍या कमी दिवसांत घटस्फोट मंजूर होण्याची दुर्मिळ बाब आहे.

सुनील (वय 30) आणि सुनीता (वय 30) (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. तो आर्किटेक्‍ट, तर ती डॉक्‍टर आहे. दोघांचे ऍरेंज मॅरेज झाले होते. दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाल्याने ते जानेवारी 2020 पासून विभक्‍त राहत आहेत. दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल केला. पतीकडून ऍड. प्रणयकुमार लंजिले, ऍड. नयना अनभुले, ऍड. अनिकेत डांगे आणि ऍड. लक्ष्मण सावंत यांच्या मार्फत दावा दाखल केला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात हा निकाल झाला. दोघांना अपत्य नव्हते. तिला 12 लाख रुपये देण्याचे मान्य करण्यात आले.

दोघेही दीड वर्षांहून अधिक काळ विभक्‍त राहत होते. त्यांना एकत्र आणण्यासाठी कुटुंबीयांच्या चार ते पाच बैठका झाल्या. त्यामध्ये दोघे एकत्र येणे शक्‍य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे दोघांनी परस्पर संमतीने केलेले अर्ज न्यायालयाने त्वरित मंजूर केला. त्यामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे जीवन जगण्यास मोकळे झाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post