जीवनगौरवी जे.एफ.सर



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८५०८ ३०२९० )


महाराष्ट्रातील ख्यातनाम अर्थतज्ञ,शिक्षणतज्ञ आणि समाजवादी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष मा.प्रा. डॉ.जे.एफ.पाटील यांना डॉ. डी वाय. पाटील  अभिमत विद्यापीठाचा 'डॉ.डी. वाय.पाटील जीवन गौरव पुरस्कार ' विद्यापीठाच्या सोळाव्या वर्धापन दिनी बुधवार ता. १ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदान करण्यात आला. कोल्हापुरचे जिल्हाधिकारी मा. राहुल रेखावार यांच्या हस्ते आणि विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. डॉ.जे.एफ. पाटील यांनी हा पुरस्कार पत्नी सौ. कमल पाटील यांच्यासह स्वीकारला.

यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील,कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल ,प्र कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा ,कुलसचिव डॉ.विश्वनाथ भोसले ,के. प्रथापन आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. या अतिशय मानाच्या जीवनगौरव पुरस्कारा बद्दल डॉ.जे.एफ. पाटील यांचे समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि भरभरून शुभेच्छा...!

डॉ.जे.एफ.पाटील हे अर्थशास्त्र विषयाचे गाढे व्यासंगी,  ख्यातनाम वक्ते, लेखक, विचारवंत  म्हणून सुपरिचित आहेत. जयकुमार फाजगोंडा पाटील हे त्यांचे पूर्ण नाव.पण ' जे.एफ '  या नावाने ते सर्वपरिचित आहेत. अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व लाभलेले जे.एफ.सर फार मोठा शैक्षणिक वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातून आले. आळते हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील पोलीस दलात सेवेत होते.शिवाजी विद्यापीठाच्या सर्वांगीण वाटचालीत डॉ.जे.एफ. पाटील यांचे योगदान मोठे राहिलेले आहे.अर्थशास्त्राचे प्राध्यापक,विभाग प्रमुख, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक,गोडबोले अध्यासनाचे प्रमुख  म्हणून त्यांनी दिलेले योगदान अतिशय मौलिक स्वरूपाचे आहे. सर कुलगुरू झाले असते तर त्यांनी निश्चितच सर्वांगीण लौकिकात अधिक भर घातली असती यात शंका नाही.

महाराष्ट्रातील बहुतांश सर्व विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर त्यांनी काम केलेले आहे. महाराष्ट्र शासन, शिवाजी विद्यापीठासह अनेक संस्थांनी त्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अर्थविषयक समित्यांवर नियोजन समितीवर त्यांनी काम केले आहे. मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या वाटचालीतही सरांचे योगदान अतिशय मोठे आहे.भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे सर उपाध्यक्ष होते.मराठी व इंग्रजी मध्ये सातत्याने लेखन करणाऱ्या जे.एफ.सरांची साठहुन अधिक पुस्तके प्रकाशित आहेत.

समाजवादी प्रबोधिनीच्या स्थापनेपासून सर प्रबोधिनीच्या कार्यात सक्रिय आहेत. प्रबोधिनीच्या सुरुवातीच्या  काळात आचार्य शांताराम गरुड यांनी विविध विषयातले जे अभ्यासक, संशोधक शोधले आणि त्यांना प्रबोधन चळवळीशी जोडून घेतले त्यात जे.एफ.सरांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. समाजवादी प्रबोधिनीच्या कोल्हापुरातील अनेक बैठका जे.एफ.सरांकडेच होत असतात. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने सुरुवातीपासून अर्थशास्त्रविषयक पुस्तिका निघाल्या आणि १९९०पासून  '  'प्रबोधन प्रकाशन ज्योती' हे नियमित मासिक सुरू झाले  त्यामध्ये जे.एफ. सरांचे अर्थशास्त्र विषयक लेखनाचे योगदान सर्वात मोठे आहे.आजही त्यांचे 'अर्थाअर्थी ' हे सदर सुरू आहेच.सरांचे मराठी व इंग्रजी वाचन प्रचंड आहे.अर्थशास्त्राबरोबर,साहित्य,कला,राजकारण,

तत्वज्ञान,धर्म,शिक्षण असे सगळे विषय त्यांच्या सूक्ष्म वाचनाचा भाग असतात.त्यामुळे त्यांचे लेखन व वक्तृत्व नेहमीच त्यांच्या व्यक्तिमत्वा प्रमाणे भारदस्त असते.

 अर्थशास्त्रविषयक लेखकांची, वक्त्यांची एक फळीच त्यांनी उभी केली. हे अर्थशास्त्रीय प्रबोधनाच्या क्षेत्रातील अनमोल स्वरूपाचे कार्य आहे. जे.एफ.सरांच्या लिखाणाचा वेग प्रचंड आहे. आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीसुद्धा ते सातत्यपूर्ण लेखन करत असतात. त्याविषयी बोलत असतात. अर्थशास्त्रासारखा क्लिष्ट विषय ते लेखनातून व बोलण्यातून कमालीचा सोपा व  सुलभ करतात. तो कार्यकर्त्याच्या ध्यानात येईल अशा स्वरूपाची मांडणी ते करत असतात. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली ४४ वर्षे ' केंद्रीय अर्थसंकल्प व्याख्यानमाला ' घेतली जाते.ती जे.एफ. सरांनी एक हाती सांभाळलेली आहे.विषयांची विभागणी व वक्त्यांची निवड ते त्यांच्या अनुभवातून फार नेमकी करतात.नवे अभ्यासक,वक्ते घडवतात. हे नमूद करताना या साऱ्याचा गेल्या तीन तपाचा सहकारी साक्षीदार म्हणून मला मनस्वी आनंद होतो. तसेच प्रबोधिनीच्या वतीने विविध शाखांवर आयोजित केली जाणारी अभ्यास शिबिरे ,व्याख्याने,चर्चासत्रे , मेळावे यामध्येही त्यांचे योगदान अतिशय महत्वाचे असते.जातिवंत शिक्षकाने निवृत्तीनंतरही कसे सक्रिय राहिले पाहिजे याचे उत्तम उदाहरण जे.एफ.सर आहेत. सतत लेखन,वाचन,भाषण,स्वतः ड्रायव्हिंग करत ते दीर्घ पल्ल्याचा प्रवास आजही करतात.त्यांचा वेग सर्वार्थाने अचंबित करणारा आहे.

प्रारंभीच्या काळात आचार्य शांताराम गरुड आणि गेली दहा वर्षे  ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.एन.डी. पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समाजवादी प्रबोधिनीची जी वाटचाल सुरू आहे त्यामध्ये प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. यापूर्वी त्यांना आदर्श

 शिक्षकासह अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.तसेच मराठी अर्थशास्त्र परिषदेचा डॉ.श्री.आ.देशपांडे जीवन गौरव पुरस्कार,शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचा कुलपती डॉ.पतंगराव कदम जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. अशा या आदरणीय व्यक्तिमत्त्वाला आणि समाजवादी प्रबोधिनीतील आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकाला हा जीवनगौरव पुरस्कार मिळाला याचा मला व संपूर्ण समाजवादी प्रबोधिनी परिवाराला मनस्वी आनंद आहे.


--------------------------------------------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post