व्यक्ती येतात,जातात.विचारच मागे उरत असतात.

 

शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर,

अंनिसच्या स्थापनेच्या जुळवाजुळवी पासूनचा आपला स्नेह अखेरपर्यंत वाढताच होता.तुम्ही सर्वांची साथ घेत चळवळ उभी केलीत.आज आठ वर्षे झाली तुमचा खून होऊन.त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात मी ' सनातनी विकृती आणि विवेकी संस्कृती ' हे पुस्तक लिहिलं व ते प्रकाशितही झालं.ऍड.गोविंद पानसरे यांनी त्याला प्रस्तावना लिहिली होती.आम्ही दोघांनी मिळून या विषयावर अनेक लोकजागरण सभा घेतल्या. अर्थात ऍड.पानसरेकाका शहीद झाल्यावर आजही तशा सभा घेत आहोतच.पाठोपाठ डॉ.कलबुर्गी,गौरी लंकेश अशा अनेकांचे बळी गेले.त्यांच्यासह परिवर्तनाचा लढा लढणारे अनेक योद्धे शहीद झाले.प्रबोधनाचा जागर आम्ही सारे अखंड करत राहूच,कारण ती आमची जीवननिष्ठाच आहे.पण विकृती आणि विवेकाच हरवणं सगळीकडेच दिसू लागलंय. वाढत चाललंय. 

व्यक्ती येतात,जातात.विचारच मागे उरत असतात.कोणत्याही चळवळीच यशापयश शेवटी वैचारिक परिपक्वतेवरच ठरत असतं.व्यक्तिवादी विकृती वाढणं आणि विवेकाचं शहीद होणं याची वेदना तीव्र असते.परिवर्तनाकडे  ' 'इव्हेंट 'म्हणून नव्हे तर 'मूव्हमेंट ' म्हणून बघणाऱ्यां आयुष्यदानी कार्यकर्त्यांची जखम विवेकाच्या शहीद होण्याने जास्तच भळभळत राहते हे सार्वकालिक सत्य आहे. अर्थात सॉक्रेटिस पासून गांधीजींपर्यन्त सर्वांकडूनच अंतिम विजय विवेकाचाच होतो हा इतिहास आहे.आपणही तोच वसा व विचारवारसा पुढे नेत आहोत. डॉ.दाभोळकर आठव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!

आपल्या चळवळीसाठी मी अठरा - वीस वर्षांपूर्वी लिहिलेली व तुम्हाला आवडलेली गझल आज पुन्हा तुम्हाला अभिवादन म्हणून..


असती परंपरांच्या साचुन अंधश्रद्धा

निचरा करू तयांचा सोडून अंधश्रद्धा..


प्यालास तू गणेशा होतास दूध कोठे ?

 मूर्तीस दूध गेल्या पाजून अंधश्रद्धा..

 

बाबा,बुवा नि माता सत्संग थोर यांचा

जाती चराचराला व्यापून अंधश्रद्धा..

 

श्रद्धा कशास म्हणती ? व्याख्या नवी करूया

श्रद्धेचा चाललेल्या मिसळून अंधश्रद्धा..

 

 द्यावा सुशिक्षितांनी वाच्यार्थ शिक्षणाला 

 व्हावे विवेकवादी फेकून अंधश्रद्धा...


--प्रसाद माधव कुलकर्णी

५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेट

समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजी

ता.हातकणंगलेे जि .कोल्हापूर

पिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र)

Aahe

( ९८ ५०८ ३० २९०)

Prasad.kulkarni65@gmail.com

Post a Comment

Previous Post Next Post