शहीद प्रशांत निर्मळे यांना अखेरचा निरोप



 पृथ्वीराजसिंग राजपूत

दत्तवाड :(ता शिरोळ)येथील टाकळीवाडी येथील जवान प्रशांत चंद्रकांत निर्मळे ( वय ३५ ) हे भोपाळ मध्य प्रदेश येथील रेल्वे अपघातात शहीद झाले आहेत . ते पंजाब येथील फिरोजपूर येथे कार्यरत होते . ते सुट्टीसाठी गावी येत होते . त्यावेळी भोपाळ येथील अपघातात ते शहीद झाले.त्यांचे प्राथमिक शिक्षण इचलकरंजी येथे झाले असून , २००१ मध्ये कोल्हापूर येथून ते सैन्यात भरती झाले होते .

सैन्यदलातून सुट्टीवर घरी येण्यासाठी निघालेल्या टाकळीवाडी च्या वीर जवान प्रशांत निर्मळे यांचे अपघाती निधन झाले होते, गुरुवारी त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी टाकळीवाडी येथे आणण्यात आले असताना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवास पुष्पमाला अर्पण करीत अभिवादन केले .आणि आदरांजली वाहिली, जवान निर्मळे यांच्या परिवाराची भेट घेऊन  त्यांचे सांत्वन केले, त्याचबरोबर परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली.

त्यामध्ये सैनिक टाकळी मधील माजी सैनिक संघटनेचा ही समावेश होता. सैन्यदलाच्या गाडीतून निघालेल्या जवान निर्मळे यांच्या अंत्ययात्रेत हजारो तरुणांनी सहभाग नोंदवून शहीद प्रशांत निर्मळे अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार श्री. आरगे, सैन्य दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते, अमर रहे, अमर रहे, प्रशांत निर्मळे अमर रहे अशा घोषणा देत अंत्ययात्रा टाकळीवाडी गावांमधून काढण्यात आली . लहान थोर, युवक, वडीलधारी मंडळी आणि महिलांसह संपूर्ण गाव अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. टाकळीवाडी गावावर शोककळा पसरली होती, ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून जवान निर्मळे यांना आदरांजली वाहिली.

सैन्य दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून जवान प्रशांत निर्मळे यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली, शोकाकुल वातावरणात जवान निर्मळे यांच्या पार्थिवावर मोठ्या मुलीच्या हस्ते टाकळी वाडी येथील स्मशानभूमीत भडाग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले,त्यांच्या पश्चात वडील , पत्नी , दोन मुली , भाऊ असा परिवार आहे .

Post a Comment

Previous Post Next Post