"महात्मा फुले यांचे व्यसनमुक्ती विषयक विचार
*-डॉ.विकास पाटील,सैनिक टाकळी,जि.कोल्हापूर.9881172889.*


*महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला.तरुणांनी व्यसनापासून दूर राहून चांगले आरोग्य प्राप्त केले पाहिजे,या मताचे ते होते.महात्मा फुले हे लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत जाऊन युवकांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला द्यायचे. जोर,बैठका, कुस्ती,मल्लखांब या क्षेत्रात ते पारंगत होते. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही तसेच सामाजिक क्रांती शक्य नाही,म्हणून त्यांनी मनापासून भरपूर अभ्यास केला.*

*एकदा मळ्यातून उसाची मोळी घेऊन येताना त्यांनी पाहिले की, गोरे दारुडे सैनिक दारू पिऊन लोकांना शिव्या देतात,धिंगाणा घालतात.याचा राग त्यांना आला.त्या सैनिकांनी त्यांच्या खांद्यावरील मोळीतील 4 ऊस उपसून घेऊन,त्यांना ढकलून दिले.ज्योतिबा त्यांच्यावर धावले आणि उसाने त्यांना फोडून काढले.सैनिक पळून गेले.लोकांनी ज्योतिबांना डोक्यावर घेऊन नाचले आणि म्हणाले,"शाब्बास संत वीरा! त्यांना असाच धडा दिला पाहिजे."*

*ज्योतिबांनी अखंड लिहिले. बहुजन समाज शिकला पाहिजे, व्यसनमुक्त झाला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी अनिष्ट रूढी-परंपरा यावर हल्ला चढविला. छ.शिवरायांच्यावर 908ओळीचा जगातील पहिला पोवाडा लिहून, जगातील पहिली शिवजयंती 19 फेब्रुवारी 1869 ला साजरी केली.*

*दारुड्याच्या दुर्गुणांवर प्रकाशझोत टाकताना ज्योतिबा म्हणतात,*

*दुर्गुणांचा छंद ज्यास बा लागला|*

*भिक्षा घालण्याला पात्र नाही||*

*खोटा बोलणारा मद्यपी निव्वळ|*

*घाली ना अगळ तर्कटास||*


*इंग्रजी शिक्षण घेऊन सत्याची कास धरावी,मात्र व्यसनाचा 100% त्याग करा,असा संदेश देताना ज्योतिबा लिहितात-*

*इंग्रजी लिहावे भाषण करावे|*

*जगात त्यागावे व्यसनास|| चाळीशीच्यावर त्यांनी दीक्षा घ्याव्या|*

*शाळा तपासाव्या गावोगावी||*

*सत्यधर्माचा महिमा पुन्हा सांगण्याचा मोह ज्योतिबांना सुटत नाही,याबाबत ते म्हणतात-*

*यवनी लिहावें भाषण करावे|*

*सर्वस्वी त्यागावे व्यसनास||*

*चाळीशीच्या वर ज्यानी दीक्षा घ्याव्या|*

*शाळा तपासाव्या नगरीच्या||*

*सुमिशीया सर्व करा सत्यवादी|*

*त्याची जहामर्दी जगाठायी||*

*जगा माजी एक सत्यधर्म खास|*

*सर्वत्रांसा ज्योती म्हणे||*

*दुर्गुणांची साथ सोडून कल्याणकारी मार्गाची कास धरण्याचा सल्ला देताना ज्योतिबा म्हणतात-*

*मातापित्यामुळे होईना कुलीन|*

*दुर्गुणाची खाण जगामाजी||*

*द्रव्याच्या बळाने दारूस सोडीना|*

*पाळी व्यसनांना लाज गेली||*


*दुसऱ्यांना व्यसनाच्या आहारी ढकलून देणाऱ्या कुनीतीबद्दलही ज्योतिबा पोटतिडकीने टीका करतात-*

*खोटे बोलूनी मां अज्ञान्या पिडणे|*

*लुटूनियां खाणे भावंडास||* *विश्वासघाताने मित्रास नाडणे ही नव्हेत लक्षणे|सज्जनांची||*

*धंदा कलालाचा कुटुंब पोरुणे|*

*मद्यपी करणे मुलीमुलां||*

*मानवाचा सत्यधर्म खरी नाती|*

*बाकीची कुनीती ज्योती म्हणे||*


*दारूवरचा पैसा चांगल्या कामासाठी खर्च करावा असा आग्रह ज्योतिबा करताना-*

*थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा|*

*तोच पैसा भरा ग्रंथासाठी||*

*ग्रंथ वाचीतांना मनी शोध करा|*

*देऊं नका थारा वैरभावा||*


*दारुड्याच्या मूर्खपणामुळे कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्या यातना विषद करताना ज्योतिबा-*

*व्यभिचारासवें व्यसनी अम्मल|*

*भार्चेची अक्कल गुंग केली||*

*दारूच्या नादांत मूढ खर्च करी|*

*करीतो भिकारी मुलाबाळां||*


*मद्यपानगृहांच्या वाढीला विरोध करणारे पत्र-*

*महात्मा फुले यांनी पुणे नगरपालिकेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष प्लकेंट यांना 18 जुलै 1880 रोजी पत्र लिहून मद्यपानगृहांच्या वाढीच्या सरकारी धोरणाला ठाम विरोध केला.दूरदृष्टी ठेवून लिहिलेले हे दुर्मिळ पत्र वाचकांच्यासाठी देत आहोत.*


*"नगरपालिकेने बराच पैसा खर्च करून लोकांचे आरोग्य सांभाळण्याच्या उद्देशाने बराच मोठा नोकरवर्ग नेमला आहे.तथापि,ज्या पुणे शहराला दारूचे गुत्ते परिचित नव्हते त्यात आत्ता भरवस्तीत दारूचे गुत्ते उघडल्यामुळे लोकांच्या नैतिक अधःपाताची सर्व बीजे पेरली जात आहेत. त्यामुळे शहराचे आरोग्य सांभाळणे हा जो नगरपालिकेचा एक उद्देश आहे त्याला बाधा येत आहे.दारूचे व्यसन हे नागरिकांच्या नैतिक आचरणाला बाधक आहे;एवढंच नव्हे, तर त्यांच्या आरोग्यालाही अतिशय अपायकारक आहे,हे माझे म्हणणे बहुतेक लोक आपल्या खुशीने मान्य करतील.दारूचे गुत्ते शहरात उघडल्यापासून दारूबाजी इतक्या प्रचंड प्रमाणावर वाढली आहे की,त्यामुळे अनेक कुटुंबांचा संपूर्ण नाश झाला आहे आणि या दुर्गुणाला आता शहरात सराईतणा आला आहे.या व्यसनाच्या प्रसाराला काही प्रमाणात तरी आळा बसावा म्हणून मी नगरपालिकेला अशी सूचना करतो की, नगरपालिकेने या दारूगुत्त्यांवर ते ज्या प्रमाणात हानी करतात त्याच प्रमाणात कर बसवावा.मला असे कळते की,कुठल्याही नगरपालिकेने गुत्त्यांवर कर बसविलेला नाही;मात्र त्यांच्यावर मध्यवर्ती सरकारचा कर असतो.या बाबतीत आवश्यक तर नगरपालिकेने चौकशी करावी;मात्र हा ठराव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवल्यास मी आभारी होईन."*


आवाहन -

*म.फुले यांच्या 194 व्या जयंतीनिमित्त त्यांची जयंती घरात बसूनच,त्यांनी लिहिलेली पुस्तके,ग्रंथ वाचून साजरी करावी.त्यांच्या चरित्रातून आपण स्वतः व्यसनमुक्त होण्याचा संकल्प करून आपल्याबरोबरच आणखी 194 लोकांना व्यसनमुक्त करण्याच्या अभियानात सहभागी होऊया!*

*क्रांतिबा ज्योतिबा फुले यांना विनम्र शिव अभिवादन !*

*आणि मानाचा मुजरा!!*

*सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!*

*घरातच राहूया!कोरोनाला हरवूया!!*

*जय जिजाऊ!जय शिवराय!!*

*जय ज्योतिबा!!!*

*डॉ.विकास पाटील,*

*प्रदेश कार्याध्यक्ष,मराठा सेवा संघ प्रणित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती परिषद,महाराष्ट्र.*

*संचालक,छ.शंभूराजे आधार व्यसनमुक्ती शुगर मुक्ती मार्गदर्शन केंद्र,*

*सैनिक टाकळी,जि.कोल्हापूर आणि सांगली.*

9881172889.

Post a comment

0 Comments