सातारा जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या करोना लसीकरणासाठी पाच ठिकाणी प्रायोगिक तत्वावर लसीकरण करण्यात येणार



 सातारा, दि. 30 - जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या करोना लसीकरणासाठी पाच ठिकाणी प्रायोगिक तत्वावर लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करून अँपॉईंटमेंट घेऊन याठिकाणी दिवसात फक्त 200 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

जिल्हयात दि.1 मे पासून18 ते 44 वर्षातील नागरिकांना करोना लसीकरण केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर जिल्हा रुग्णालय, कराडचे उपजिल्हा रुग्णालय, महाबळेश्‍वरचे ग्रामीण रुग्णालय, शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्र व खटाव प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव या ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणारअसल्याचे गौडा यांनी सांगितले.45 वर्षावरील सर्व लोकांना मोफत लसीकरण सुरु करण्यात आले होते. सहा लाखांच्यावर लसीकरण झाले आहे. राज्यस्तरावरुन लस साठा उपलब्ध झाल्यानंतर जिल्हयात इतर ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात येणार आहे.

फक्त ऑनलाइन नोंदणी केल्यासच लस

18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी फक्त ऑनलाइन नोंदणी केली असेल तर ऑनलाइन तारीख व अँपॉईंटमेंट असणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय लसीकरण होणार नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांनी केंद्र शासनाच्या कोविन ऍपवर ऑनलाइन नोंदणी करावी. नोंदणी करुन तारीख व वेळ घेतलेल्या नागरिकांना मिळालेल्या दिवशी व वेळेलाच लसीकरण करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत चालत येऊन किंवा ऑन दि स्पॉट नोंदणी व लसीकरण करण्यात येणार नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post