आज सामाजिक क्रांतीचे प्रानेतेबमहात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन



आज सामाजिक क्रांतीचे प्रानेतेबमहात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन , १४ एप्रिलला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन , आणि आदर्श लोकराजा शाहू महाराज यांचा २६ जून हा जन्मदिन ",सामाजिक न्याय दिन ' म्हणून साजरा केला जातो. या महामानवांचा केवळ नामजप करून उपयोग नाही तर विचार जपला पाहिजे ती आजची गरज आहे.त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.आणि याचे औचित्य साधून आजची गझल...


शाहू फुले आंबेडकर

-----------------------


नुसते नको बोलायला शाहू फुले आंबेडकर

 कृतीत घ्या आणायला शाहू फुले आंबेडकर..


वेदोक्त अन शिक्षण तसा पाणी पिण्याचा हक्कही

लोकास आले द्यायला शाहू फुले आंबेडकर...

 

 माणूस आहे जात अन  माणुसकी हा धर्म हे

 आले इथे  शिकवायला शाहू-फुले-आंबेडकर ..

 

समता खरी नांदायला ज्यांना हवीशी वाटते 

त्यांनी हवे वाचायला शाहू फुले आंबेडकर...


आकाश उंचीचे असे जे लोक झाले मोजके 

त्यांच्यात घ्या  मोजायला शाहू-फुले-आंबेडकर..


धर्मापरी ,जातीपरी माणुसकी ज्यांना हवी

 त्यांना हवे सांगायला शाहू-फुले-आंबेडकर...

 

धर्मांध उतरंडीमुळे ठरले बळी त्यांना इथे

आले प्रतिष्ठा द्यायला शाहू-फुले-आंबेडकर ..


अंधारल्या ज्यांच्या पिढ्या, नाकारली ज्यांना घरे

आले तया उचलायला शाहू-फुले-आंबेडकर ...


ज्यांनी दुकाने थाटली त्यांना कधी उमगेल का ?

कोते आम्ही जाणायला शाहू-फुले-आंबेडकर..


 त्यांच्या विचारांची दिशा जाऊ पुढे घेऊन रे

 केवळ नको घोकायला शाहू फुले आंबेडकर...



                       प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

                               ( ९८ ५०८ ३० २९० )

Post a Comment

Previous Post Next Post