नियम पाळून, एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांना आधार दिला पाहिजे. हेच खरे अँटिबॉडीज आहे.



करोना विरुद्ध लढण्यासाठी शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्यास या आजारावर विजय मिळविता येतो असे सांगितले जाते; परंतु अँटिबॉडीज केवळ औषधाच्या दुकानात मिळत नाहीत, तर अन्यत्रही मिळतात. मोबाइल स्क्रीनवर एखाद्याचे नाव पाहून आपल्याला आनंद होतो, तेव्हा अँटिबॉडीज तयार होतात. संकटकाळी कुणी खांद्यावर हात ठेवला, तरी अँटिबॉडीज तयार होतात. आपल्या दोस्तीच्या अँटिबॉडीजमुळे एखाद्याला संजीवनी मिळू शकते. त्यामुळे एक नवीन काम आपण केले पाहिजे.

सध्या महामारीची भीती आपल्या सर्वांच्या मनात मूळ धरून बसली आहे; परंतु कोणत्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी आवश्‍यक असते ती उमेद. चिमण्या पंखांच्या नव्हे तर उमेदीच्या साह्याने उडतात असे म्हटले जाते.म्हणूनच ज्या पक्षाची उमेद मोठी त्याची भरारी उंच असते. त्यामुळेच आपल्याला सध्याच्या काळात आपण आपल्याला भीतीकडे नेणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे.

एकवेळ विषाणूपासून बचाव शक्‍य आहे; परंतु जी भीती आपल्या मनात खोलवर रुतून बसली आहे, त्यापासून बचाव अशक्‍य आहे. भीतीपेक्षा धोकादायक विषाणू या जगात कोणताही नाही. प्रत्येक समस्या कमकुवत व्यक्‍तीसाठी 'भीती' आहे तर ज्ञानी माणसासाठी 'संधी' आहे. समस्येचे संधीत रूपांतर व्हायचे असेल तर विचार बदलला पाहिजे. विचार बदलण्यासाठी वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहणे-ऐकणे आणि सोशल मीडियावर महामारीच्या संदर्भातील मजकूर वाचणे बंद केले पाहिजे. असा मजकूर सोशल मीडियावर स्वतःसुद्धा टाकू नये. कोणतीही पोस्ट टाकण्यापूर्वी ती माहिती खरी आहे का, याची खातरजमा केली पाहिजे. गुगलकडे असे एक सॉफ्टवेअर आहे, त्याचा लाभ घेतला पाहिजे.

बातम्या ऐकणे किंवा पाहणे अशासाठी थांबविले पाहिजे, की केवळ आपल्या देशातच बातमीदारीचा स्तर अत्यंत उतरलेला आहे. धगधगत्या चिता, खच्चून भरलेली रुग्णालये, रुग्णांचे चिंताक्रांत नातेवाईक हे सारे वास्तव आहे; परंतु ते दाखविलेच पाहिजे असे नाही. अर्धा तासाच्या स्लॉटमध्ये त्याच त्या बातम्या पुनःपुन्हा दाखविण्यात काय हशील? अखेर या साऱ्यांना साध्य काय करायचे असते? महामारी आहे, ती नियंत्रणाबाहेर आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. बरे झालेल्या रुग्णांच्या मुलाखती दाखविल्या तर लोकांना दिलासा मिळणार नाही का? ऑक्‍सिजन सिलिंडर कुठे मिळतो आहे, हे सांगावे. प्लाझ्मा दात्यांचा डेटाबेस तयार करावा. कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, हे सांगावे. रुग्णवाहिका सेवेचा तपशील द्यावा. ज्या बातम्यांमुळे उमेद वाढेल अशा बातम्या प्रसारित कराव्यात. लोकांच्या मनात असा विश्‍वास जागवावा, की कितीही मोठी अंधारी रात्र असली, तरी सकाळ होतेच!

जगण्यासाठी दीर्घायुष्याबरोबरच दुर्दम्य इच्छाशक्‍तीही हवी. स्टीफन हॉकिंग, जॉर्ज बर्नार्ड शॉ, शरद पवार ही त्याची काही ठळक उदाहरणे आहेत. हॉकिंग एकवीस वर्षांचे असताना डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले होते की, एका महाभयानक आजारामुळे आता त्यांच्या आयुष्यातील दोनच वर्षे उरली आहेत. डॉक्‍टरांची भविष्यवाणी खोटी ठरवणाऱ्या हॉकिंग यांना पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. नोबेल पुरस्कार विजेते जॉर्ड बर्नार्ड शॉ जेव्हा आजारी पडले तेव्हा डॉक्‍टरांनी सांगितले होते की, अंडी आणि मांस खाल्ले नाही, तर ते बचावणार नाहीत; परंतु ते प्राणीप्रेमी होते. डॉक्‍टरांच्या सल्ल्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. शरद पवार यांना 2004 मध्ये डॉक्‍टरांनी सांगितले होते की, जीवनातील अखेरचे सहा महिनेच तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यांना कर्करोग झाला होता. शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतर सतरा वर्षांनीसुद्धा आज ते अत्यंत कृतिशील जीवन जगत आहेत. ही इच्छाशक्‍ती निर्माण करण्यासाठी विचार बदलणे गरजेचे आहे.

करोनाविरुद्ध लढण्यासाठी शरीरात अँटिबॉडीज तयार झाल्यास या आजारावर विजय मिळविता येतो असे सांगितले जाते. परंतु अँटिबॉडीज केवळ औषधाच्या दुकानात मिळत नाहीत, तर अन्यत्रही मिळतात. मोबाइल स्क्रीनवर एखाद्याचे नाव पाहून आपल्याला आनंद होतो, तेव्हा अँटिबॉडीज तयार होतात. संकटकाळी कुणी खांद्यावर हात ठेवला, तरी अँटिबॉडीज तयार होतात. आपल्या दोस्तीच्या अँटिबॉडीजमुळे एखाद्याला संजीवनी मिळू शकते. त्यामुळे एक नवीन काम आपण केले पाहिजे. ते म्हणजे स्वतःची आणि इतरांची भीती घालवली पाहिजे. नियम पाळून, एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांना आधार दिला पाहिजे. हेच खरे अँटिबॉडीज आहे.


Post a Comment

Previous Post Next Post