शरद पवार , अमित शहा यांच्या भेटीचे रहस्य




महाराष्ट्रातील सध्याच्या वादग्रस्त विषयावरून वातावरण चांगलेच पेटलेले असताना काल अचानक शरद पवार आणि अमित शहा यांच्या गुप्त भेटीची बातमी झळकली आणि सगळेच कोमात गेल्यासारखे झाले. भाजप समर्थक आणि भाजप विरोधक असा जोरदार सामना महाराष्ट्रात पेटलेला असतानाच थेट अमित शहांनी पवारांना त्रयस्थ स्थळी भेटायला बोलावण्याच्या बातमीवर नेमकी काय भावना व्यक्‍त करावी, हेच संबंधित पक्षाच्या नेत्यांना कळेनासे झाले. ही भेट अदानींच्या अहमदाबादमधील फार्महाउसमध्ये झाली असे सांगतात. पण त्या भेटीचे कोठूनही नीट कन्फर्मेशन आलेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून याचा ठाम इन्कार करण्यात आला आहे. तर तिकडे अमित शहा हे, 'सारी बातें सार्वजनिक नहीं की जा सकती हैं' असे नरोवा कुंजरोवा शैलीचे विधान करताना दिसले आहेत.

राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते नवाब मलिक मात्र ही भेट झाली असल्याचे अजून कबूल करायला तयार नाहीत. या भेटीचा इतका इत्थंभूत तपशील बाहेर आला आहे की त्यातून या दोन्ही नेत्यांची भेट झाली नसावी, असे म्हणायला वावच शिल्लक राहिलेला नाही. अमित शहांच्या या अहमदाबाद भेटीपूर्वी अहमदाबाद पोलिसांना केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या मुव्हमेंटची नोंद करू नका आणि काही वेगळा बंदोबस्त तेथे लावू नका, अशी सूचना करण्यात आल्याचेही छापून आले आहे. एके ठिकाणी तर डिनरच्या निमित्ताने ही भेट झाली आणि तेथे जेवणाचा मेनू पूर्ण शाकाहारी होता अशीही माहिती छापून आली आहे. पवारांच्या बरोबर प्रफुल्ल पटेल होते हेही या बातम्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे. इतका सगळा तपशील बाहेर आल्यानंतर अशी भेट झालीच नाही असा दावा कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्‍न निर्माण होतो. महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच गृहमंत्र्यांना कोंडीत पकडून मोठे रणकंदन माजवले असताना भाजपचे मोदींनंतरचे सर्वोच्च नेते अमित शहा हेच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना त्रयस्थ स्थळी डिनरला कसे बोलावतात याचा हेतू स्पष्ट होण्याची गरज आहे.

गेले काही दिवस अक्षरश: हमरीतुमरीवर वाद घालणारे भाजप व महाविकास आघाडीचे नेते या भेटीच्या वृत्ताने एकदमच सैरभैर झाले आहेत. यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर बेफाम आरोप करायचे की नाही याविषयी भाजप नेत्यांमध्येही यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असणार यात शंका नाही. कारण अमित शहा आणि पवार यांच्या भेटीचा हेतू आणि त्याचा तपशील जोपर्यंत माहीत होत नाही तोपर्यंत आपण यावर कोणतेही भाष्य करणे राजकीय शहाणपणाचे ठरणार नाही, असे वातावरण भाजप नेत्यांच्यापुढेही निर्माण झाले असणार. अमित शहांच्या मनात नेमके काय आहे हे समजल्याशिवाय आता उठसूठ राष्ट्रवादी कॉंग्रेसविषयी किंवा महाविकास आघाडीच्या एकूणच राजकारणाविषयी फार गंभीर भाष्य करणे टाळायला हवे इतका तरी राजकीय सूज्ञपणा भाजप नेत्यांना आता दाखवावा लागेल. सचिन वाझे, स्फोटकाची गाडी, मनसुख हिरेन हत्या, बदल्यांचे रॅकेट, रश्‍मी शुक्‍लांचे फोन टॅपिंग या साऱ्या विषयांचा एकापाठोपाठ एक पद्धतीने मारा झाल्यानंतर या साऱ्या प्रकरणाची बाजू भाजपवरच उलटवण्यात राज्यातील सत्ताधारी यशस्वी झालेले दिसत असतानाच अमित शहांनी पवारांशी चर्चा करण्याचा प्रसंग घडणे याचा अर्थ मामला मोठ्याच गंभीर पातळीवर गेला आहे हे स्पष्ट आहे.

अमित शहा हे पाच राज्यांतील निवडणूक प्रचारात व्यस्त असताना आणि त्यातही त्यांची सारी शक्‍ती केवळ पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीत केंद्रित झाली असताना त्यांना अहमदाबादला येऊन पवारांची भेट घेण्याची गरज भासत असेल तर महाराष्ट्र एटीएसने शोधून काढलेल्या बाबी भाजपच्या अडचणी वाढवणाऱ्या तर नसतील ना अशीही शंका उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही. महाराष्ट्राच्या या अत्यंत वादग्रस्त प्रकरणांच्या चौकशीसाठी कोणाचीही मागणी नसताना तेथे एनआयए ही केंद्राची तपास यंत्रणा घुसवण्यात आली आणि त्यानंतरही महाराष्ट्र सरकारने राजकीय हुशारी दाखवून आपल्या एटीएसमार्फत या प्रकरणाचा समांतर तपास सुरू ठेवला होता. खरे-खोटे माहिती नाही, पण त्यातून काही गुजराथी कनेक्‍शन हाती लागल्याचेही सांगितले गेले होते. महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे कोडे उलगडले होते व या प्रकरणात काही जणांना त्यांनी अटकही केली होती. नंतर एनआयएने लगबगीने ठाण्याच्या कोर्टात जाऊन महाराष्ट्र एटीएसला तपास थांबवण्यास सांगितले आणि त्या पाठोपाठ अमित शहा यांना पवारांच्या भेटीची गरज भासली या घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न केला तर तर्काने काही निष्कर्ष काढता येऊ शकतो. पण या भानगडीत जरी सर्वसामान्यांनी न पडण्याचे ठरवले तरी या दोन्ही नेत्यांची भेट झाली काय आणि त्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे लोकांना समजणे आता आवश्‍यक बनले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post