इचलकरंजीची कुस्तीपटू आर्या नवनाळे ठरली महिला सरपंच केसरी किताब



इचलकरंजी - चिकोडी तालुक्यातील श्री क्षेत्र नेज येथे महाशिवरात्री निमित्त घेण्यात आलेल्या आंतरराज्य कुस्ती स्पर्धेत महिला गटात इचलकरंजीतील कु. आर्या विश्‍वजित नवनाळे (तालीम चंदूर) हिने प्रथम क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या सोनाली चव्हाण हिला लाटणे डावावर चितपट करुन अजिंक्यपद मिळविले. तसेच महिला सरपंच केसरी किताब, दोन किलो चांदीची गदा आणि रोख रक्कम असे पारितोषिक तिला प्रदान करण्यात आले. चांदीची गदा मिळविणारी कु. आर्या ही इचलकरंजी परिसरातील पहिलीच महिला कुस्तीपटू ठरली आहे.

नजीकच्या सीमाभागातील नेज येथे महाशिवरात्र निमित्त दरवर्षी कुस्ती मैदान भरविण्यात येते. यंदाच्या मैदानात इचलकरंजीतील महिला कुस्तीपटू कु. आर्या नवनाळे हिची पुण्याच्या सोनाली चव्हाण हिच्यासोबत प्रथम क्रमांकाची कुस्ती होती. अत्यंत चुरशीने झालेल्या या लढतीत आर्या हिने चव्हाणवर लाटणे डावावर मात करुन महिला सरपंच केसरी किताब पटकविला. बक्षिस वितरण समारंभ यात्रा कमिटी व कुस्ती कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण निंबाळकर यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी बापूसाहेब काळगे, सुरेश यडुरे आणि आण्णाप्पा चिनुणनवरे उपस्थित होते.

कु. आर्या हिला डबल नरसिंह केसरी पै. सचिन पुजारी यांचे मार्गदर्शन व वडील ललित नवनाळे यांचे प्रोत्साहन लाभत आहे. आर्या हिने आजवर डीकेटीई प्रशालेकडून खेळताना विभागीय आणि राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत बक्षिसे मिळविली आहेत. तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post