हक्‍काची जागा म्हणून फॅशन स्ट्रीटची ओळख होती , कुणाची नजर लागली आणि सर्व काही रातोरात ठप्प झालं



पुणे : आपल्याला सगळं कसं स्वस्तात मस्त हवं असतं..आणि ते सर्व मिळवून देणारी हक्‍काची जागा म्हणून फॅशन स्ट्रीटची ओळख होती. नव-नव्या फॅशनचे कपडे, फॅन्सी गॉगल्स, घरगुती वापराच्या वस्तू, कॅप, चामडी वस्तू हे सर्व मिळण्याचं हे हक्‍काचं ठिकाण होतं.

युवक-युवतींना आवडणारे स्टाईलीश कपडे अगदी हव्या रंगात आणि स्वस्तात इथं मिळायचे. तर, घर चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची या मार्केटमध्ये रेलचेल होती. दर्जा कसाही असो, वेळ भागवून न्यायची असेल तर फॅशन स्ट्रीट इथं होणाऱ्या खरेदीला खरंच तोड नव्हती..ज्यांना स्वस्तात वस्तू हवी आहे, त्यांना 'बार्गेनिंग' करण्यासाठी हे मिनी मार्केट खरोखरंच भारी होतं.अनेकांना रोजगार देणारं ठिकाण होतं. कॉलेजात शिकणारे मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी, सर्वसामान्य नोकर-चाकर वगैरे मंडळींना वीकेंडच्या खरेदीसाठी फॅशन स्ट्रीट एक आवडीचा 'स्पॉट' होता.

खरेदीनंतर इथल्याच परिसरात मिळणारी पाणीपुरी, भजी, बिर्याणी, आइस्क्रीम खाण्यासाठीही वर्दळ असायची. खेळणी घेण्यासाठी हट्ट करणारी लहान मुलं, 'झ्यॅंकी-पॅंकी' गॉगल लावून फिरणारे युवक असं चित्र नेहमीच इथं असायचं.इथल्या जवळपास 700 दुकानांचे चालक, तिथले कामगार, खरेदीसाठी आलेले ग्राहक असा लवाजमा गृहित धरला तरी, एकावेळी 5 ते 7 हजार नागरिक इथं गुण्या-गोविंदानं व्यवहार करायचे. इथल्या व्यापाऱ्यांचे दूरदेशीच्या व्यापाऱ्यांशीही घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे अर्थकारणाची साखळी बरोबर जुळली गेली होती.

या मार्केटसोबतच परिसरालाही सायंकाळच्या सुमारास 'बहार' यायचा. त्यातून अर्थचक्र फिरायचं आणि शेकडो कुटुंबं रात्रीच्या भाकरीची जाडाजोड करायची. पार्किंगवाल्यापासून पान दुकानापर्यंत सर्व काही इथं मिळायचं…अगदी 10 रुपयांचं लिंबू सरबतसुद्धा..! जणू एखादा भव्य आलिशान मॉल असावा, असं रूप या फॅशन स्ट्रीटचं होतं. इमारत सोडली, तर झगमगाटासोबतच बाकी सगळं तिथं होतं. पण, लॉकडाऊन काळात या बाजाराला जणू कुणाची नजर लागली आणि सर्व काही रातोरात ठप्प झालं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post