पुणे : करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांना अनिश्‍चित काळासाठी बंदी 

पुणे - शहरात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांना अनिश्‍चित काळासाठी बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्‍त विक्रम कुमार यांनी मंगळवारी रात्री काढले. तर अंत्यसंस्कार आणि अंत्यविधीसाठी 20 जणांना उपस्थित राहण्यास मुभा देण्यात आली आहे.

शहरात गेल्या महिन्याभरापासून करोनाच्या साथीचा आलेख वेगाने वाढला आहे. त्यामुळे अवघ्या महिन्याभरातच शहरात 12 हजारांहून अधिक सक्रिय बाधित रुग्ण आढळल्याने करोना रुग्णांना प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.त्यात शाळा, महाविद्यालये, सायंकाळची उद्याने बंद करण्यात आल्यानंतर आता गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. करोना रुग्ण कमी होत असताना, राजकीय, सांस्कृतिक तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना 200 लोकांच्या उपस्थितीची मुभा देण्यात आली होती.

मात्र, या कार्यक्रमांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त गर्दी होत असल्याने तसेच करोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजवाणी होत नसल्याने आता या सर्व कार्यक्रमांना सकसकट बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्तांनी काढलेल्या आदेशात शहरातील शासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या उपस्थितीबाबत संभ्रम असून आदेशात महापालिका हद्दीतील सर्व कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील असे नमूद केले आहे. मात्र, ती शासकीय का खासगी याबाबत उल्लेख नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

मॉल, हॉटेल, थिएटरही 10 वाजता बंद
दरम्यान, शहरातील प्रतिबंधित क्षेत्रा बाहेरील मॉल, थिएटर, रेस्टॉरंट, बार, फूट कोर्ट यांना रात्री 10 पर्यंतच मुभा असणार असून घरपोच जेवणाची सुविधा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तसेच या ठिकाणी प्रतिबंधात्मक सूचनांची माहिती दर्शनीय भागात लावणे बंधनकारक असून नियमभंग झाल्याचे आढळल्यास या अस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याची कारवाई केली जाणार आहे.

धार्मिक स्थळांनाही बंधने
दरम्यान, या आदेशात धार्मिक स्थळांमधील प्रवेशावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. या ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार, सामाजिक अंतर ठेवून नागरिकांना प्रवेश दिला जाईल तसेच व्यवस्थापनास ऑनलाइन पासची सुविधाही देता येईल, याशिवाय, लग्नसमारंभासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहता येईल.

Post a comment

0 Comments