भूदान ते भूजप्ती : सत्तर वर्षातील बदल१९५१ मध्ये तेलंगणात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू होता. तेथे शांततेचे आवाहन करण्यासाठी विनोबा गेले होते. जमीनदार आणि शेतमजूर यांच्यात पराकोटीचा संघर्ष असल्याचे त्यांना दिसले.त्यावेळी त्यांनी भूदानाबाबत आपले विचार मांडले.त्यावर प्रभावित होऊन  १८ एप्रिल १९५१ रोजी रामचंद्र रेड्डी यांनी शंभर एकर जमीन या चळवळीला दान केली.त्यातून विनोबांनी भारतभर यात्रा सुरू केली.त्याला या महिन्यात  सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत.विनोबांचे भूमिहीनांना भूमी देऊ पाहणारे समतेसाठीचे भूदान आंदोलन ते केंद्र सरकारचे भांडवलशाहीच्या अंगभूत विषमतेला उचलून धरणारे असलेल्या जमिनी काढून घेणारे भूजप्ती धोरण हा सत्तर वर्षातील फरक आहे.....

भूदान ते भूजप्ती : सत्तर वर्षातील बदल

-----------------------------------------------

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९०)


थोर सर्वोदयी विचारवंत,गांधीजीनी पहिला सत्याग्रही म्हणून निवडलेले आदर्श सत्याग्रही,सर्वोदय समाजाचे संस्थापक,भूदान चळवळीचे प्रवर्तक,भारतीय तत्वज्ञान अर्थात दर्शन परंपरेचे अभ्यासक व भाष्यकार अशी विविधांगी ओळख असलेले व्यक्तित्व म्हणजे भारतरत्न आचार्य विनोबा भावे उर्फ विनायक नरहरी भावे .विनोबांचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे या गावी झाला.आणि  १५ नोव्हेंबर १९८२ रोजी पवनार येथे परंधाम आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून वयाच्या ८८ व्या वर्षी ते कालवश झाले.आजोबा शंभुराव ( वाई) आणि आई रुक्मिणीबाई यांचे धर्मपरायणतेचे संस्कार बालपणापासून त्यांच्यावर झाले.विनोबांचे वडील नरहरी हे नोकरी करत होते.नोकरीच्या निमित्ताने हे कुटुंब बडोद्याला गेले.परिणामी विनोबांचे माध्यमिक व उच्च शिक्षण बडोद्याला झाले.१९१६ साली ते इंटरची परीक्षा द्यायला मुंबईला निघाले पण वाटेतच सुरतला उतरून त्यांनी वाराणसी गाठली.वाराणसीत हिंदू विश्वविद्यालयात त्यांनी महात्मा गांधी यांचे भाषण ऐकले.त्याने ते प्रभावित झाले.गांधीजींची प्रत्यक्ष भेट,पत्रव्यवहार सुरू झाला.त्यांनी नैष्ठीक ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा केली.आणि एक वर्षासाठी वाईच्या प्राज्ञपाठशाळेत ते वेदांत व ब्रह्मविद्या यांच्या अभ्यासासाठी आले.


प्राज्ञपाठशाळेत त्यांनी स्वामी केवलानंद सरस्वती ( नारायणशास्त्री मराठे)  यांच्याकडे उपनिषदांपासून शांकरभाष्यापर्यंत विविध विषयांचे अध्ययन केले.याठिकाणी साप्ताहिक चर्चासत्रेही होत असत.त्यात सामाजिक,राजकीय,धार्मिक,वैचारिक असे सर्व विषय चर्चिले जात असत.विनोबा त्यात अहिंसक क्रांतीची भूमिका मोठ्या हिरीरीने व अभ्यासपूर्णपणे मांडत.वेदान्तविषयात त्यांनी फार सखोल ज्ञान मिळवले.आपण कोणते ग्रंथ अभ्यासले याची सविस्तर माहिती त्यांनी पत्राने गांधीजींना कळवली.गांधीजींनी त्यांना अभिनंदनाचे पत्र लिहिले.त्यात ‘ ए गोरख,तुने मच्छीन्द्र को भी जित लिया ‘ असे लिहिले होते.


विनोबा वाईहून फेब्रुवारी १९१८ मध्ये अहमदाबादला आले.त्यावेळी देशभर साथीचा आजार पसरला होता.विनोबांचे कुटुंबीय या साथीत आजारग्रस्त झाले.गांधीजींच्या आग्रहाने विनोबा कुटुंबियांच्या सेवेला बडोद्याला आले.त्या साथीत विनोबांच्या आई व लहान भाऊ कालवश झाले.पुरोहितांकडून अंत्यविधी संस्कार विनोबांना मान्य नव्हता म्हणून ते ज्येष्ठ पुत्र असूनही स्मशानात गेले नाहीत.वडिलांनी प्रथेप्रमाणे अंत्यविधी केला.काही दिवसांनी विनोबा साबरमतीला पुन्हा आले.


१९२१ साली गांधीजींचे कार्यकर्ते जमानालाल बजाज यांनी साबरमती आश्रमाची वर्ध्याला शाखा काढली.गांधीजींनी विनोबांना त्या शाखेचे प्रमुख पाठविले.८ एप्रिल १९२१ रोजी वर्ध्यात आलेल्या विनोबांनी भूदान यात्रा व इतर काही काळ सोडला तर अखेरपर्यंत येथेच तपश्चर्या करत जीवन खर्च केले.सूतकताई,सुतविणाई,शरीरश्रम,शेती,मानसिक व अध्यात्मिक साधना हा त्यांचा दैनंदिन व्यवहार होता.’शरीर श्रमनिष्ठा ‘ हे त्यांचे व्रत बनले होते. १९३० व ३२ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी तुरुंगवास भोगला.यावेळी धुळे कारागृहात असताना त्यांनी त्यांची  गाजलेली ‘गीता प्रवचने ‘ दिली.१९४० साली गांधीजीनी वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सुरू केले त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली होती.पं.जवाहरलाल नेहरू दुसरे सत्याग्रही होते.सत्याग्रह हे शत्रूच्या हृदय परिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन असे मानणाऱ्या गांधीजींना अध्यात्मिक साधनेला वाहून घेतलेल्या विनोबांची सर्वप्रथम निवड करणे योग्य वाटले.२० ऑक्टोबर १९४० च्या ‘हरिजन ‘ च्या अंकात गांधीजींनी विनोबांची ओळख करून दिली आहे.


१९३६ पासून गांधीजी साबरमती आश्रम सोडून सेवाग्रामला येऊन राहिले.सेवाग्राम व पवनार जवळ असल्याने गांधीजी व विनोबा यांचा  दैनंदिन संवाद होऊ लागला.याच काळात स्वातंत्र्य आंदोलन वेग घेत होते.छोडो भारत आंदोलना नंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.पण सहा महिन्याच्या आतच राष्ट्रपिता गांधीजींचा खून झाला.गांधीजी गेल्यावर विनोबांनी ‘सर्वोदय समाज ‘  स्थापन केला.गांधीजींनी रस्किनच्या ‘ अन टू धिस लास्ट ‘ या पुस्तकाचा गुजराती भाषेत अनुवाद केला होता.त्याला ‘ सर्वोदय ‘  असे नाव दिले होते.सर्वोदय हा विचार सत्य व अहिंसा यावर आधारित स्पर्धा होता.विषमता,शोषण,संघर्ष यांना त्यात स्थान नव्हते.सर्वाना संधीची समानता देणारा हा विचार होता.विनोबांनी नैतिक,आर्थिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रात  समता प्रस्थापित करणे,शासनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी सत्तेचे विकेंद्रीकरण , स्वावलंबी गाव ,सर्वांचा अभ्युदय,जगा व जगू द्या यापेक्षा ‘इतरांसाठी जगा ‘याला प्राधान्य आदी उद्दिष्टे सर्वोदयाची आहेत हे सांगितले.माणूस मुळात सद्वर्तनी ,त्यागी,परोपकारी,शांतताप्रिय आहे पण सामाजिक परिस्थितीने तो या गुणांपासून दूर जातो असे सर्वोदय विचार मानतो.


ज्येष्ठ अभ्यासक र.सी.अभ्यंकर यांच्या मते,’ विनोबा प्रणीत सर्वोदयी विचारांनुसार ग्रामसंघटनेपेक्षा श्रेष्ठतर अशी सत्ता कोणतीच राहणार नाही.प्रांतिक सत्ता फक्त ग्राम संघटना घडवून आणेल आणि राष्ट्रीय सत्ता प्रांतांची सत्ता घडवून आणणारी निमित्तमात्र संघटना असेल.अशा स्वायत्त राष्ट्रांचे परस्पर सहकार्य घडवून आणणारी अखिल मानवसत्ता देखील निमित्तमात्र असेल.ग्रामसंघटना व जागतिक संघटना यांच्या दरम्यान प्रशासनांची उतरंड असणार नाही.जनता स्वावलंबी व सहकारी झाल्यावरच अशी राजकीय व्यवस्था निर्माण होऊ शकेल…अर्थात नजीकच्या भविष्यात कदाचित हा विचार प्रत्यक्षात उतरू शकणार नाही.पण त्यात ज्या आदर्श मानवी समाजाची कल्पना आहे ती निश्चितच तर्कसंगत व आकर्षक आहे. “


१९५१ मध्ये विनोबांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांविरोधी शांततामय क्रांतीचा संदेश देण्यासाठी ‘सब भूमी गोपालकी ‘,आणि ‘जय जगत ‘ ही घोषणा केली.आणि ७ मार्च १९५१ पासून सेवाग्रामहून ऐतिहासिक भूदान आंदोलनाची  पदयात्रा सुरू केली.आंतरिक शुद्धी,बाह्य शुद्धी,श्रम,शांती व समर्पण हे पाच मुद्दे या मुद्यांवर कार्यकर्त्यांनी भर द्यावा असे त्यांनी सांगितले.१८ एप्रिल १९५१  रोजी आंध्रप्रदेशात  नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात ते पोहोचले.तेथे त्यांनी भूमिहीनांसाठी जमीन मागण्याचे आंदोलन सुरू करत असल्याचे जाहीर केले.जमिनीच्या योग्य वाटणीतून खरी सामाजिक क्रांती होईल अशी त्यांची भूमिका होती.त्यानंतर जवळ जवळ चौदा वर्षे विनोबांनी देशभर पदयात्रा करून हजारो एकर जमीन दान घेऊन त्यांनी ती भूमिहीनांना दिली.अनेक डाकूंनी आत्मसमर्पण केले.या आंदोलनातून फार मोठी फलनिष्पत्ती झाली नाही पण ती क्रांतिकारी भूमिका जगभर गाजली यात शंका नाही.

स्वातंत्र्यानंतर राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था यात मोठे बदल झाले. जगभरच जमिनीची मालकी आणि लोकसंख्या यांच्यातील विषमता शतकानुशतके होतीच. या विषमतेतून  बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून भूदान चळवळ हा उपाय ठरेल अशी विनोबांची भूमिका होती.कुठेही जुलूम जबरदस्ती यांचा अवलंब न करता  मानवी मनातील कारुण्य भावनेला आवाहन करण्याचा हा प्रयत्न होता. खरेतर समता व समाजवाद कारुण्य भावा ऐवजी ऐवजी आर्थिक समतेतूनच येऊ शकतो ही शास्त्रीय बाब आहे.विनोबा मन:परिवर्तनाच्या भूमिकेतून याकडे पाहत होते.ही भूदान चळवळीची अंगभूत व स्वयंसिद्ध मर्यादा होती.

१९५१ मध्ये तेलंगणात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू होता. तेथे शांततेचे आवाहन करण्यासाठी विनोबा गेले होते. जमीनदार आणि शेतमजूर यांच्यात पराकोटीचा संघर्ष असल्याचे त्यांना दिसले.त्यावेळी त्यांनी भूदानाबाबत आपले विचार मांडले.त्यावर प्रभावित होऊन  १८ एप्रिल १९५१ रोजी रामचंद्र रेड्डी यांनी शंभर एकर जमीन या चळवळीला दान केली.त्यातून विनोबांनी भारतभर यात्रा सुरू केली. १८ एप्रिल २०२१ रोजी भूदान चळवळीच्या प्रारंभाला सत्तर वर्षे पूर्ण होत आहेत.आणि आज सत्तर वर्षानंतर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करणारे कायदे केंद्र सरकार करत आहे.देशाच्या राजधानीत गेले सव्वाचार महिने शेतकरी या कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत.त्यात दोनशेवर शेतकरी बळी गेले आहेत.सरकार  हे आंदोलन बदनाम करण्याचे , खोटी षडयंत्र रचून बदनाम करण्याचे,आंदोलन बेदखल करण्याचे,शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न करते आहे.पण आता लोकक्षोभ वाढत आहे.कोणाचीही इतकी मुजोरी भारतीय जनता सहन करत नाही हा इतिहास आहे.विनोबांचे भूमिहीनांना भूमी देऊ पाहणारे समतेसाठीचे भूदान आंदोलन ते केंद्र सरकारचे भांडवलशाहीच्या अंगभूत विषमतेला उचलून धरणारे असलेल्या जमिनी काढून घेणारे भूजप्ती धोरण हा सत्तर वर्षातील फरक आहे. विनोबा ते टागोर , दादाभाई नौरोजी ते कर्मवीर भाऊराव पाटील असे अनेक मान्यवर त्यांच्या वाढलेल्या दाढीमुळे ओळखले जात.पण त्या दाढीमागे त्यांचा अस्सल प्रामाणिक चेहरा होता.ते ढोंग वाटत नव्हतं.सत्तर वर्षातील हाही फरक आहे.


विनोबा म्हणत होते ,' सर्व समाजात आमूलाग्र बदल घडवणे हेही भूदानाचे कार्य आहे. सामाजिक कर्तव्य म्हणून जमीन हस्तांतरित करणे हा या परिवर्तनामधील लाक्षणिक भाग आहे. या लाक्षणिक कृत्यातून मूल्यपरिवर्तन घडवून आणणे हे साध्य आहे. जनशक्तीला आवाहन करून शासनसंस्था व राज्यकर्ते यावर कमीत-कमी अवलंबून राहून ,त्यागाची भूमिका वाढवून, सामाजिक भेदाना छेद देऊन 'एक गाव एक परिवार ' हे स्वप्न सत्यसृष्टीत उतरवणे हे भूदानाने साधावयाचे आहे. कायदा व जबरदस्ती हे समाजजीवनाचे मुलाधार असू शकत नाहीत.खरे समाजजीवन हे प्रेम व सहानुभूती यावरच अवलंबून असते. त्यामुळे सहयोग ,सदिच्छा यावर आधारलेले समाजजीवन साऱ्यांचे हृदयपरिवर्तन घडवून आणेल हे तत्वज्ञान भूदान चळवळी मागे आहे.' या चळवळीत मिळालेल्या जमिनीची मशागत करण्यासाठी सर्व वर्ग एकत्र येतील.सुशिक्षितांनाही श्रमाचे मोल कळेल, आणि सामाजिक ,राजकीय व आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण होईल.सर्वांची कर्तुत्वशक्ती जागी होऊन श्रमशक्तीचे विराट दर्शन होईल असा आशावाद विनोबांना होता.पण ते होऊ शकले नाही.कारण केवळ नैतिकता व भूतदया यावर असे मोठे प्रश्न सुटत नसतात. शिवाय त्याला जोडून येणाऱ्या इतरही समस्या होत्याच.त्यामुळे या भूमिकेच्या यशस्वितेच्या मर्यादा होत्याच.आणि काळाने त्या दाखवूनही दिल्या.


पवनार येथे १९७० साली विनोबांचा अमृतमहोत्सव दिमाखात साजरा झाला.८ ऑगस्ट १९७२ रोजी ‘गीता प्रतिष्ठान ‘ स्थापन केले. १९७५ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी आणीबाणी पुकारली.विनोबांनी त्याचे ‘अनुशासन पर्व ‘ म्हणून उदात्तीकरण केले व पाठिंबा दिला.विनोबांवर ‘सरकारी संत ‘अशी टीकाही झाली.अर्थात आणीबाणीवरील भारतीय जनमानसाची नाराजी थोडीच टिकली.कारण १९८०  च्या प्रारंभी इंदिराजी पुन्हा बहुमताने सत्तेवर आल्या.


विनोबांनी प्रचंड लेखन केले.त्यांनी मराठी व हिंदीत दोनशेवर पुस्तके लिहिली.ती बहुतेक सर्व भारतीय भाषांत अनुवादित झाली.वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी ,’ आता देह आत्म्याला साथ देत नाही.रखडत जगण्यात अर्थ नाही.जराजर्जर शरीर सोडून टाकणे योग्य ‘अशी भूमिका घेत प्रायोपवेशन सुरू केले.इंदिरा गांधी यांच्यापासून आचार्य दादा धर्माधिकारी यांच्या पर्यंत अनेकांनी त्यांना अन्नपाणी,औषधे घेण्याची विनंती केली.पण त्यांनी ठामपणे नकार दिला.आणि  १५ नोव्हेम्बर १९८२ रोजी कालवश झाले.त्याला काहींनी ‘महानिर्वाण ‘ म्हटले,काहींनी ‘युगपुरुषाची समाधी ‘ असे म्हटले. भारत सरकारने त्यांना १९८३ साली मरणोत्तर ‘भारतरत्न ‘या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले.गांधीवादी विचारांचे अध्यात्मिक वारसदार असलेल्या विनोबांना अनेकदा प्रखर टीकेला सामोरे जावे लागले.पण त्यांनी केलेले  दार्शनिक लेखन,कृतिकार्य, जीवनकार्य निर्विवादपणे मोठे आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली एकतीस वर्षे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे ‘संपादक ‘आहेत.)

Post a comment

0 Comments