करोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्‍यता , बाधितांची संख्या वाढत आहे,



पुणे - 'करोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्‍यता असून; बाधितांची संख्या वाढत आहे, ही हलकी सुरूवात आहे,' असे महापालिकेतील आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील वर्षी मार्चमध्ये करोना प्रादुर्भावाने हाहा:कार माजण्याला सुरूवात झाली होती, त्याचीच पुनरावृत्ती याही वर्षी होते की काय? अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. कारण बाधितांची संख्या वाढत चालली आहे. ही वाढ अशीच सुरू राहिली तर ही रुग्णवाढ म्हणजे करोनाची दुसरी लाट ठरू शकते, अशी भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात, हवेत झालेला बदल, गारठा या सगळ्यांमुळे सर्दी, खोकला, तापसदृश लक्षणांमध्ये वाढ झाली असून, संशयित रुग्णांच्या संख्येतही गेल्या आठवडाभरापासून बाधितांची शंभर-दीडशेपर्यंत आलेली संख्या आता साडेतीनशेपर्यंत गेली आहे.

लॉकडाऊन अद्यापही आहे, अजूनही सुरक्षेचे सगळे नियम पाळायचे आहेत याचे भानच नागरिकांना राहिले नाही. लॉकडाऊन संपला नाही, तो शिथिल झाला आहे, याची जाणीव नागरिकांना होणे आवश्‍यक आहे. सगळी आस्थापना, बाजारपेठा आणि सगळे व्यवहार आता 'ओपन' झाल्यामुळे नागरिकांमधील भीतीच कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सार्वजनिक वावरात एकप्रकारचा बिनधास्तपणा आला आहे, त्या वागण्यातूनच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले आहेत


मास्क वापरण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, कारवाईमध्ये रोजच्या रोज अनेकांकडून दंड वसूल केला जात आहे. याशिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचा तर फज्जाच उडालेला सगळीकडे पहायला मिळत आहे. मॉल, दुकाने, बाजारपेठा या सगळ्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग ना व्यापाऱ्याकडून पाळले जाते ना ग्राहकांकडून असे चित्र दिसते. अनेक सरकारी आणि कार्यालयेही सुरू झाली असल्याने, मोठ्याप्रमाणात वर्दळ सुरू झाली आहे. सुरूवातीला कारवाईच्या भीतीने सॅनिटायझेशन केले जात होते, परंतु आता कोठेही सॅनिटायझेशनचे गांभीर्य राहिले नसल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post