गोल्डनमॅन असणं आता घातक ठरु लागलं आहे.पुणे
 
| सोन्याचा हव्यास आपल्याला काही नवा नाही, मात्र हीच सोनं मिरवण्याची हौस समाजातील काहीजण छंद म्हणून जोपासत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यासह महाराष्ट्रात अशाप्रकारे अनेक गोल्डनमॅन उदयास येत आहेत. प्रामुख्याने गुंठामंत्री असलेल्या इलाक्यात हे फॅड सध्या चांगलंच वाढलं आहे, मात्र हेच गोल्डनमॅन असणं आता घातक ठरु लागलं आहे, कारण गोल्डनमॅन लोकांना मृत्यू अकाली गाठत असल्याचं दिसत आहे.

पुणे-नगर रोडवरील लोणीकंद येथे सचिन शिंदे या गोल्डनमॅनची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी त्याचं निधन झालं आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या यातील एक गोळी सचिनच्या मानेतून आरपार गेली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

सचिन शिंदे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता, त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो जामीनावर बाहेर आला होता. मात्र दोघा अज्ञातांनी त्याच्यावर गोळीबार करुन त्याचा जीव घेतला, सचिन शिंदेवर झालेला हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी अधिक धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

दरम्यान, सचिन शिंदे गोल्डनमॅन म्हणून लोणीकंद परिसरात चर्चेत होता. त्याचे किलोनं सोनं अंगावर घातलेले फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. त्याच्या मृत्यूनंतरही अनेकांनी त्याला श्रद्धांजली वाहणारे स्टेटस तसेच सोशल मीडियात श्रद्धांजलीच्या पोस्ट टाकल्याचं दिसत आहे, मात्र हा पुण्याचा एकमेव गोल्डनमॅन नाही जो अकाली आयुष्याची लढाई हरला. याआधी तीन गोल्डनमॅनचं अशाच प्रकारे अकाली निधन झालं आहे.

 गोल्डनमॅन. 

1.रमेश वांजळे- सर्वात आधी गोल्डनमॅन म्हणून रमेश वांजळे यांचा उदय झाला. एक पैलवान ते आमदार असा त्यांचा प्रवास होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करुन त्यांनी २००९ सालची विधानसभा निवडणूक लढवली होती. सोनं अंगावरुन घालूनच त्यांनी या निवडणुकीचा प्रचार केला होता. त्यामुळे त्यांची चांगलीच क्रेझ पहायला मिळाली होती. मात्र वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

2.दत्ता फुगे- रमेश वांजळे यांचा मृत्यू झाल्यानंतर गोल्डनमॅन म्हणून राष्ट्रवादीचे नेते दत्ता फुगे यांचा उदय झाला. २०१२ साली त्यांनी सोन्याचा शर्ट शिवल्यानंतर त्यांची लोकप्रियता शिगेला पोहोचली होती. जगातील सर्वात महागडा शर्ट घातलेली व्यक्ती म्हणून त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद देखील झाली.

दत्ता फुगेंच्या पत्नी राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या, ते स्वतः २०१४ च्या आमदारकीसाठी भोसरी विधानसभा मतदारसंघातून आग्रही होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. फुगे एका पतसंस्थेवर पदाधिकारी होते. तसेच त्यांची एक फायनान्स स्कीमही होती. याच आर्थिक संबंधातून त्याचे काही जणांसोबत वितुष्ट निर्माण झाले होते. वाढदिवस साजरा करण्याचं निमंत्रण देऊन त्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर दगडाने ठेचून अत्यंत निर्घुणपणे त्यांचा खून करण्यात आला होता. दुसऱ्या गोल्डनमॅनचा अशाप्रकारे वयाच्या ४७ व्या वर्षी अंत झाला.


3.सम्राट मोझे-
 माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे सम्राट हे पुतणे होते. त्यांची सोने अंगावर घालण्याची पद्धत थोडी वेगळी होती, ते एकाच वेळी ८ ते १० किलो सोनं अंगावर घालत असत. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी त्यांना छातीत त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र हृदयविकाराच्या झटक्यानेच त्यांचा मृत्यू झाला.

पुण्यातील या तीन प्रसिद्ध गोल्डमॅननंतर आता सचिन शिंदे या चौथ्या गोल्डमॅनलाही अकाली मृत्यूनं गाठलं आहे. त्यामुळे वारेमाप सोनं अंगावर घालणं आता घातक ठरु लागलंय की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे, त्यामुळे स्वतःला गोल्डनमॅन म्हणून घेणाऱ्यांनीही आता या प्रकाराचा धसका घेतला आहे..

Post a comment

0 Comments