50 टक्‍के बेड रिकामे ठेवण्याची खासगी रुग्णालयांना सूचना.



मोहम्मद जावेद मौला : 

पुणे :  – करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयातील 50 टक्के बेड तरी राखीव ठेवावेत, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी रुग्णालय चालकांना मंगळवारी दिल्या. बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, उपाययोजना म्हणून महापालिकेने बेडची जमवाजमव करायला सुरूवात केली आहे. त्या संदर्भात महापालिकेने खासगी रुग्णालय चालकांची मंगळवारी बैठक बोलावली होते. यावेळी शहरातील सर्व छोट्या-मोठ्या रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरोग्य प्रमुख डॉ. आशीष भारती यांनी याविषयी माहिती दिली.

महापालिकेने मागील वर्षी एप्रिल, मेनंतर राज्यसरकारच्या निर्देशानुसार खासगी रुग्णालयांतील बेड नियंत्रणात आणण्याला सुरूवात केली. त्यानुसार सुमारे पाच हजारांपेक्षा जास्त बेड करोना बाधितांसाठी राखीव ठेवण्यात आले. मात्र बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर हे बेड अन्य आजाराच्या रुग्णांसाठी वापरण्याला तात्पुरती परवानगी देण्यात आली. मात्र ती देताना पुन्हा करोनासारखी आपत्कालिन परिस्थिती उद्‌भवल्यास बेड देण्याची तयारी ठेवावी अशी हमी रुग्णालयांकडून घेण्यात आली. त्यानुसार आता पुन्हा एकदा बेड राखीव ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्याचे डॉ. भारती यांनी सांगितले.

सध्याची करोना बाधितांची नियंत्रणात असलेली संख्या लक्षात घेता, मागील वेळी जेवढे राखीव ठेवले होते त्याच्या 50 टक्के बेड राखीव ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याचा अर्थ असा आहे की, मागील वर्षी करोनाच्या जास्त झालेल्या प्रादुर्भावाच्या काळात ज्या रुग्णालयांनी 400 बेड राखीव ठेवले होते, त्यांनी सध्या दोनशे बेड राखीव ठेवावेत, असे महापालिका आयुक्तांनी या बैठकीत सांगितल्याचे डॉ. भारती म्हणाले.

बेड राखीव ठेवण्याबरोबरच कोणीही बाधितांना ऍडमिशन नाकारायचे नाहीत, अशाही सूचना केल्या आहेत. या सूचनांचे लेखी पत्रही प्रत्येक रुग्णालयाला देण्यात येणार आहे. याची रुग्णालयांकडून लेखी माहितीही घेण्यात येणार आहे, जी डॅशबोर्डवर अपडेट करण्यात येईल. या रुग्णालयांत 4 हजार 457 बेड आहेत. त्यातील 1 हजार 072 बेड सरकारी रुग्णालयातील आहेत. त्यातील 30 बेड प्रसूतीसाठी राखीव आहेत. तसेच सध्या डॅशबोर्डवर खासगी आणि सरकारी रुग्णालयातील मिळून 155 विना व्हेन्टिलेटर आणि 211 व्हेन्टिलेटरसह आयसीयू उपलब्ध आहेत.
– डॉ. आशीष भारती, आरोग्य प्रमुख, मनपा

Post a Comment

Previous Post Next Post