कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूलाचे काम लवकरच सुरू होणार.



कराड  शहरातील वाहतुकीची कोंडी आणि होणारे अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत. या मार्गावर कराड येथील कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल उभारण्याची मागणी वारंवार केली जात आहे. या पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना मिळाल्याची माहिती मिळाली आहे.

कोल्हापूर नाका येथे अनेक अपघात झाले आहेत. विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना यांनी लोकप्रतिनिधी तसेच केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्याद्वारे याठिकाणी उड्डाणपूल करावा अशी मागणी केली आहे. कोल्हापूर नाक्यावर उड्डाणपूल व्हावा, यासाठी आंदोलने झाली. या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांचा जीव गेला. साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय स्तरावर उड्डाणपुलासाठी प्रयत्न याला केंद्र शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे दोन्ही खासदारांनी सांगितले आहे.

कराडच्या ग्रामीण भागातून शहराच्या दिशेने येणारे रस्ते कराड शहराभोवती रिंग रोडच्या माध्यमातून जोडण्याचा प्रस्ताव असून हा रस्ता तासवडे - शहापूर - अंतवडी - कार्वे - वडगाव - हवेली - कोडोली -पाचवड फाटा असा आहे. यामुळे कराड शहराच्या पूर्व भागाला जोडणारा हा रिंगरोड असेल. तर साकुर्डी-येणके - येरावळे - विंग - धोडेवाडी फाटा ते पाचवड हा पश्चिम भागाला जोडणारा रिंग रोड असेल. तर पाटण तालुक्यातील डिचोली कोयनानगर-हेळवाक-मोरगिरी-म्हारूल हवेली-विंग-वाठार-रेठरे-शेणोली स्टेशन या राज्य महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय पातळीवर तयार करण्यात येत आहे.

बाहेरून येणाऱ्या वाहनांचा कराड शहरावरील ताण कमी व्हावा. यासाठी जुन्या कोयना पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचना देऊनही अद्याप या ठिकाणी वाहतूक सुरू झालेली नाही. तसेच या पुलानजीक असणाऱ्या झोपडपट्ट्यांचा प्रश्‍न व अरुंद रस्ता यामुळे हलके वाहने दुहेरी मार्गे ये-जा करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post