आधुनिक मॉलप्रमाणे सेवा देण्यासाठी दत्त भांडारचे नूतनीकरण करणार....गणपतराव पाटील

                 




हातकणंगले तालुका  (प्रतिनिधी): आप्पासाहेब भोसले.

                सहकारी तत्त्वावर चालणारे भांडार उभे करून ते चालविणे अडचणीचे ठरत आहे. महापूर आणि कोरोना कालावधीमध्ये दत्त भांडार एक दिवसही बंद न ठेवता ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंची सेवा देण्याचे काम केले. हे कौतुकास्पद आहे. दत्त भांडारकडे स्वतःचे भांडवल असून आधुनिक मॉलप्रमाणे सर्व्हिस देण्यासाठी आगामी काळात नूतनीकरण करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांना सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच ठिकाणाहून घरपोच सेवा  देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. शिरोळ, जयसिंगपूर प्रमाणे नृसिंहवाडी, कुरुंदवाड, इचलकरंजी येथून झुणका भाकर केंद्र सुरू करण्याची मागणी होत असून ही सेवा तेथेही देण्याचा प्रयत्न आहे. सभासदांनी आपली संस्था पुढे जाण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच सर्वांचे पाठबळ आवश्यक असल्याचे मत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले.

  श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर श्री दत्त शेतकरी सहकारी ग्राहक संस्थेच्या दत्त भांडारच्या ३८ व्या वार्षिक साधारण सभेप्रसंगी गणपतराव पाटील बोलत होते. विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना यावेळी सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

   यावेळी दत्त भांडारचे चेअरमन दामोदर सुतार यांनी सभासदांचे स्वागत करून म्हणाले, ३८ वर्षापूर्वी स्व. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांनी पाहिलेले दत्त भांडारचे स्वप्न आज खरे होत आहे. गणपतराव पाटील यांचा व्यापारी दृष्टिकोन, गाढा अभ्यास, सर्वांशी असलेले सलोख्याचे व जिव्हाळ्याचे ऋणानुबंध, समाजाशी पूर्ण बांधिलकी आणि सामान्यांच्याबद्दल कणव यामुळे गेल्या तीन वर्षात दत्त भांडारची मोठी प्रगती झाली आहे. दत्त भांडारची वाटचाल कोणत्याही वित्तीय संस्थेच्या कर्जाविना सुरू असून संस्थेची विविध बँकेत भरीव गुंतवणूक आहे. दिवसेंदिवस ग्राहकांचा विश्वास व निष्ठा यामध्ये वाढ झाल्याने संस्थेला मोठा नफा झाला असून सभासदांसाठी ८ टक्के लाभांश देण्याची तरतूद करण्यात आली आहे. महापूर, कोरोना काळात भांडारची सेवा अहोरात्र ठेवून सभासद व ग्राहकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली गेली. त्यामुळे भांडारातील सर्व सेवकांना १५ टक्के पगारवाढ, बोनस तसेच कोरोना काळात योद्ध्याप्रमाणेप काम केल्याने १५ दिवसाचा बक्षीस पगार देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. मल्टिनॅशनल सिटीसारखे अद्यावत सुपर मार्केट, भक्कम आर्थिक स्थिती, २५ ते ३० कोटी पर्यंत उलाढाल, सेंद्रिय उत्पादनाची बाजार निर्मिती अशा गोष्टी आगामी काळात भांडारच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सभासदांनी संस्थेवर निष्ठा, प्रेम व बांधीलकी वाढवावी. दत्त कारखान्याचे एम.डी. एम. व्ही. पाटील म्हणाले, अनेक ठिकाणी सहकारी बझार चालविता आल्या नाहीत. पण दत्त भांडारची घोडदौड सुरू आहे. सभासदांना लाभांश देण्यात आला आहे. दादांच्या मार्गदर्शनाचे काम स्तुत्य आहे. दत्त भांडारच्या अनेक ठिकाणी शाखा व्हाव्यात यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. दरगू गावडे म्हणाले, खाजगी बझारांच्याही पुढे आपण गेलो पाहिजे. भांडवल उभारणी अथवा नूतनीकरणाला सर्व सभासदांचे सहकार्य मिळेल. राजू पाटील म्हणाले, सहकारातही ग्राहक चळवळ सुरू झाली पाहिजे. कारण सहकार तत्त्वाने अशा संस्था चालवणे अवघड झाले आहे. पण दत्त भांडारने अखंडितपणे ३८ वर्षे सहकारी तत्त्वावर काम करून ग्राहक, सभासदांची सेवा केली आहे. हे काम खरोखरच उल्लेखनीय आहे.

    प्रारंभी स्व. सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते झाले. आर्थिक वर्षातील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विषय पत्रिकेचे वाचन जनरल मॅनेजर एस. ए. घोरपडे यांनी केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. वीरशैव बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल गणपतराव पाटील यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

     सूत्रसंचलन व्यवस्थापक पी.व्ही. कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ.राजश्री पाटील यांनी मानले. यावेळी सर्व संचालक, सभासद, दत्तच्या संचालिका विनया घोरपडे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन शामराव पाटील, परचेस मॅनेजर सुहास मडिवाळ तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post