शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन आवश्यक- अरुण मराठे यांचे प्रतिपादन




शिरोळ - (आप्पासाहेब भोसले)

 आपल्या शेतजमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थांचा ऱ्हास कमी कसा होईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास उत्पादन वाढ होऊ शकेल. शेतीत मृत सेंद्रिय पदार्थांची कमतरता असल्याने जिवाणूंची वाढ खुंटते म्हणून उत्पन्न कमी निघते. सेंद्रिय पदार्थ हा जमिनीचा आत्मा आहे. तसेच निसर्ग हा सर्वोत्तम स्थापत्यविशारद असून मातीचे आरोग्य आणि मनुष्याचे आरोग्य एकमेकावर अवलंबून असल्याने मातीची काळजी घेणे गरजेचे बनले आहे, असे मत कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक अरुण मराठे यांनी व्यक्त केले.

  शिरोळच्या श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून उमळवाड (ता. शिरोळ) येथील हनुमान मंदिरात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चर्चासत्रामध्ये अरुण मराठे बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब मगदूम होते. 

  अरुण मराठे पुढे म्हणाले, जमिनीची सुपीकता, उत्पादकता व ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान माहीत करून घेणे आवश्यक आहे. मातीवर शेती अवलंबून आहे. वनस्पतींना सोळा पोषक द्रव्ये लागतात. सूक्ष्मद्रव्ये, पोषक द्रव्ये जमिनीत साठवणे व आवश्यक असेल तेव्हा वनस्पतींना देणे हे मुख्य कार्य जमिनीचे आहे. जमिनीची पाणी धारण क्षमताही महत्त्वाची असते. पिकाला आधार देण्याचे कार्यही मातीच करीत असते. तसेच जमिनीला कुठलाही धक्का सहन करण्याची ताकत, क्षमताही मातीत असते. तापमानाचे संतुलन हेसुद्धा पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे. जमिनीमध्ये सूक्ष्म जिवाणू, बुरशी, कीटक, अॅक्टीनोमाइसिस असे विविध सजीव असतात. हे सूक्ष्मजीव वनस्पतींना आवश्यक घटकांची निर्मिती करीत असतात. त्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब,घटक असणे ही अत्यावश्यक बाब आहे. सेंद्रिय कर्ब कसा वाढवावा लागेल हे पाहणे गरजेचे आहे. कमीत कमी मशागत करून उत्पादन वाढीकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे.

   यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, ए. एस. पाटील, पप्पू चौगुले, ऋषभ पाटील, दत्तचे संचालक बाळासाहेब कोळी, दिलीप गुरव, विलास पाटील दत्त अधिकारी, मदतनीस आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. प्रारंभी स्व. डॉ. सा.रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post