गाव कारभाऱ्यांच्या निवडणुकीत दिग्गज नेत्यांना बसला झटका



सातारा : सातारा जिल्ह्यातील 652 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बालेकिल्ला राखण्यासाठी धडपडणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची भाजपने चांगलीच दमछाक केल्याचे पाहायला मिळाले. पाटण व महाबळेश्वरमध्ये शिवसेनेने भगवा दिमाखात फडकवला, तर माण व कराड दक्षिणमध्ये भाजपचे कमळ फुलले; कोरेगाव व कराड दक्षिणमध्ये वर्चस्व राखताना स्थानिक आमदारांची दमछाक झाल्याने राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

जिल्ह्यातील 878 पैकी 221 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 657 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या राजकीय रणधुमाळीचा निकाल सोमवारी लागला. यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा जोरदार राजकीय संघर्ष झाला. पदवीधरच्या निवडणुकीत गेलेली राजकीय पत पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपने राष्ट्रवादीला जोरदार टक्‍कर दिली.

कोरेगाव तालुक्‍यात पहिल्या टप्प्यात आ. महेश शिंदे गटाने पाचपैकी चार ग्रामपंचायती खिशात घालून आ. शशिकोत शिंदे यांना जोरदार झटका दिल्याचे मानले जात होते. शाशिकात शिंदे यांचे वास्तव्य असलेली ल्हासुर्णे ग्रामपंचायतसुद्धा महेश शिंदे गटाने खेचली. नंतरच्या टप्प्यात 77 पैकी 48 ग्रामपंचायती आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाने घेतल्या, तरी 29 ग्रामपंचायती का गमावल्या, याचे चिंतन त्यांना करावे लागणार आहे.

खटाव तालुक्‍यात गुरसाळे, एनकूळ, कलेढोण, पुसेगाव, निढळमध्ये परिवर्तन झाले, तर प्रभाकर घार्गे, रणजित देशमुख, धनंजय चव्हाण यांनी आपापले गड राखले. पाटण तालुक्‍यात 113 पैकी 71 ग्रामपंचायतींवर शिवसेनेने भगवा फडकावला. पाटणकर गट पिछाडीवर गेला. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपला वरचष्मा सिद्ध केला.

कराड दक्षिणेत कार्वे, शेणोली, काले, वाठार, गोळेश्वर, खुबी, नांदगाव, शिंदेवाडी या ग्रामपंचायती अतुल भोसले गटाने ताब्यात घेत काका-बाबा यांच्या मनोमीलनाला झटका दिला. आ. पृथ्वीराज चव्हाण यांची ही राजकीय पीछेहाट मानली जात आहे.

कराड उत्तरमध्ये सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी वर्चस्व राखले, पण बनवडी, पाल, चोरे, हजारमाची या महत्वाच्या ग्रामपंचायती त्यांच्या गटाने गमावल्या. कराड, कोरेगाव तालुक्‍यात सत्ता मिळाली, पण प्रतिष्ठेला तडा गेल्याचा अनुभव राष्ट्रवादीला आला.

महाबळेश्वर तालुक्‍यात 42 पैकी 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 14 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. तेथे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या डी. एम. बावळेकर गटाने दहा ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला, तर भाजपनेही दोन ग्रामपंचायती खिशात घातल्या.

वाई तालुक्‍यात 56 पैकी 40 ग्रामपंचायती आ. मकरंद पाटील यांच्या गटाने ताब्यात ठेवल्या. बावधनमध्ये राष्ट्रवादीला चिठ्ठीने तारले. भाजपला 8 तर राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या. तेथे भाजपने आमदार गटाला झगडायला लावले.

खंडाळा तालुक्‍यातही आ. मकरंद पाटील गटाला संघर्ष करायला लागला. माण तालुक्‍यात 61 पैकी 33 ग्रामपंचायती राष्ट्रवादी कडे तर 28 ग्रामपंचायती आ. जयकुमार गोरे गटाला मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी व भाजप यांच्यात खरा संघर्ष माण तालुक्‍यात झाला.

देवापूरमध्ये आमदार गटाचा सुपडासाफ झाला, तर शिखर शिंगणापूर ग्रामपंचायत शेखर गोरे यांच्या गटाकडून आ. गोरे गटाने ताब्यात घेतली. फलटण तालुक्‍यात साखरवाडी व राजाळे वगळता 80 पैकी 72 ग्रामपंचायतींवर रामराजे गटाने एकहाती वर्चस्व राखले. सातारा तालुक्‍यात 87 व जावळी तालुक्‍यातील 37 ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पकड कायम ठेवली आहे.

उदयनराजे गटाला केवळ कोडोली ग्रामपंचायतीची सत्ता राखता आली. त्यांनी दत्तक घेतलेल्या कोंडवे गावातच त्यांच्या गटाचा धुव्वा उडाला. आमदार गटाने दहा तर खासदार गटाला केवळ तीन जागा मिळाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post