भाजपचे अनेक विद्यमान नगरसेवक आमच्या संपर्कात....आमदार चेतन तुपे




पुणे : भारतीय जनता पक्ष ज्या 100 नगरसेवकांच्या बळावर महापालिकेत सत्तेत आहे. त्यापैकी ६० नगरसेक राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून ऐनवेळी भाजपात गेलेले आहेत. या ६० पैकी अनेकजण संपर्कात असून काहीजण पालकमंत्री अजित पवार यांना थेट भेटत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी केला आहे. आकड्यांत बोलण्यापेक्षा या सरकारच्या विरोधातील कल नगरसेवकांच्या लक्षात आला असून त्यामुळेच अनेक विद्यमान नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले. आमदार तुपे म्हणाले, भाजपाविषयी सामान्य माणासाला काय वाटते याचा अंदाज नगरसेवकांना आला आहे.आज ८० टक्के लोक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत. नुकत्याच झालेल्या विधान परिषद पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज आल्याने अनेकजण आमच्या संपर्कात आहेत.

मुळात भाजपाकडे असलेल्या नगरसेवकांपैकी ६० जण राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व मनसेतून आलेले आहेत. या सर्वांचा मूळ पिंड भाजपचा नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वा भाजपशी त्यांचा काहीही संबंध नाही. चार जणांचा प्रभाग व चुकीच्या पद्धतीने केलेली प्रभाग रचना यामुळे नाईलाजाने निवडणुकीच्यावेळी इतर पक्षातील नगरसेवक भाजपामध्ये गेले होते, असे तुपे यांनी सांगितले.

राजकीय करिअर संपुष्टात येऊ नये, यासाठी अनेकांनी केवळ नाईलाजाने भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे अनेकजण पालकमंत्री अजित पवार यांना वैयक्तिकपणे भेटत आहेत. यातील अनेकांना अजित पवार नावाने ओळखतात. आधीच्या सत्तेच्या काळात अजित पवार यांनीच यातील अनेकांना महत्वाची पदे दिली होती. त्यामुळे या सर्वांचा थेट संपर्क आहे. त्या संपर्कातून अनेजण भेटत असल्याचा दावा तुपे यांनी केला.

येत्या काळात बरेच नगरसेवक भाजपमधून राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत असल्याचे आमदार तुपे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून स्पष्ट होत आहे. अशा नगरसेवकांची संख्या त्यांनी स्पष्ट केली नसली तरी ही संख्या मोठी असावी असे दिसत आहे. गेल्यावेळी ६० नगरसेवक भाजपमध्ये गेले. त्यापैकी बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून गेलेले आहेत. यामध्ये त्यावेळच्या विद्यमान नगरसेवकांसह काही माजी नगरसेवकांचा समावेश होता.

पुणे भाजपमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात गटातटाचे राजकारण सुरू आहे. माजी खासदार संजय काकडे, खासदार गिरीश बापट व त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मूळच्या जनसंघ आणि आताच्या भाजपमधील निष्ठावान असे चार गट पुणे भाजपमध्ये आहेत. परिणामी मूळचे भाजपवाले नाराज आहेत. त्यातूनच अनेकजण पालकमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. येत्या काही दिवसात भाजपमधील नगरसेवकांचा एक मोठा गट राष्ट्रवादीत आला तर आश्‍चर्य वाटायला नको, असे पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post