बेळगावात घुसून कोनेवाडी गावात युवक मंडळाच्या फलकासमोर शिवसैनिकांनी भगवा ध्वज फडकवला.



(बेळगांव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी ) :

बेळगाव महानगरपालिकेसमोर फडकविण्यात आलेला कर्नाटकचा बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज हटविण्यासाठी सीमाभागात मराठी भाषकांनी पुकारलेल्या मोर्चासाठी कोल्हापुरातून शिवसैनिक निघाले होते. या शिवसैनिकांना चंदगडहून शिनोळी गावातून बेळगावमध्ये घुसताना कानडी पोलिसांनी अडविले.त्यामुळे शिवसैनिक आणि कानडी पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी 'बेळगाव आमच्या हक्काचे…', 'बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

दरम्यान, कानडी पोलिसांच्या नाकावर टिच्चून, गनिमीकाव्याने बेळगावात घुसून कोनेवाडी गावात युवक मंडळाच्या फलकासमोर भगवा ध्वज फडकवून शिवसैनिकांनी कर्नाटक प्रशासनाला चोख प्रत्युत्तर शुक्रवारी बेळगाव येथे मराठी भाषक सीमा बांधवांनी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य शिवसैनिक निघाले होते. मात्र, महाराष्ट्रातील एकाही नेत्याला सीमाभागात प्रवेश देऊ नये, असे बेळगाव प्रशासनाने बजावले होते. त्यामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरील कोगनोळी टोल नाक्यावर कानडी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

येथे कानडी पोलिसांनी शिवसैनिकांना अडविल्यामुळे कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करतच शिवसैनिकांनी कागल, गडहिंग्लजमार्गे चंदगड येथून सीमाभागालगतच्या शिनोळी गावातून बेळगावात घुसण्याचा प्रयत्न केला. येथेही कानडी पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्रातून सीमाभागात जाणारे प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच ते सोडण्यात येत होते. कानडी पोलीस प्रत्येकाची विचारपूस करून त्यांना प्रवेश देत होते.

अशा तणावपूर्ण वातावरणातही शिवसैनिकांनी बेळगावात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी कानडी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये प्रचंड झटापट झाल्याने वातावरण स्फोटक बनले होते. तरीसुद्धा कानडी पोलिसांच्या नाकावर टिच्चून, गनिमीकाव्याने बेळगावात घुसून कोनेवाडी गावात युवक मंडळाच्या फलकासमोर शिवसैनिकांनी भगवा ध्वज फडकवला.

शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पोवार यांच्यासह गडहिंग्लजचे सुनील शिंत्रे, संग्राम कुपेकर, प्रभाकर खांडेकर यांच्यासह शिवसैनिकांनी भगवा ध्वज फडकवला. 'बेळगाव आमच्या हक्काचे…', 'बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव जिल्हा प्रशासनाची बैठक

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा आक्रमक पवित्रा पाहून बेळगाव जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली. प्रशासनाच्या आवाहनावरून महाराष्ट्र एकीकरण समितीने आजचा मोर्चा स्थगित केला. यासंदर्भात पुन्हा एकदा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याशी चर्चा करून, लाल-पिवळा ध्वज हटविण्याबाबत त्वरित निर्णय घ्या; अन्यथा पुन्हा एकदा मोर्चा काढण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला, तर येत्या काही दिवसांत निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले.

मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी याबाबत माहिती दिली. याबाबत येत्या 27 जानेवारी रोजी पुन्हा बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन देत, तूर्तास मोर्चा रद्द करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यामुळे नियोजित मोर्चा स्थगित केल्याचे दीपक दळवी यांनी सांगितले. 

Post a Comment

Previous Post Next Post