AdSense code धोक्याची घंटा :

धोक्याची घंटा :

विधान परिषद निवडणुकीचा निकाल भाजप साठी धोक्याची घंटा.

PRESS MEDIA LIVE : 

पिंपरी - मोदी लाटेवर स्वार होत सन 2017 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता मिळविणाऱ्या भारतीय जनता पक्षासाठी विधान परिषद निवडणुकीचे निकाल 'धोक्‍याची घंटा' ठरण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. विरोधात जाऊ लागलेले जनमत, महाविकास आघाडी अधिकच भक्कम होणे आणि महापालिकेत सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेला भ्रष्टाचार हे मुद्दे भाजपाला अडचणीत आणण्यासाठी हातभार लावणार ठरत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बळ मिळणार आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपाचा दारुण पराभव करण्यात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यश आल्यामुळे शहरात राष्ट्रवादीसह शिवसेना आणि कॉंग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.तर कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे. त्याचा फायदा किती उचलला जातो यावरही महापालिका निवडणुकीचा निकाल ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हा एकेकाळचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मात्र सन 2017 साली या पक्षात झालेली फाटाफूट आणि मोदी लाटेमुळे भाजपाने एकहाती सत्ता मिळवत राष्ट्रवादीला दणका दिला होता. शहरवासियांनीही 'पार्टी विथ डिफरन्स'वर विश्‍वास ठेवत भरघोस मतांचे दान दिले होते.

मात्र, गेल्या साडेतीन-चार वर्षांच्या सत्ताकाळात जनतेच्या भल्यापेक्षा सत्ताधाऱ्यांचा स्वार्थ बळावल्याने पालिकेत भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात आले. मतदार आणि जनतेला गृहीत धरून सत्ता आपलीच येणार या भूमिकेत गेल्या चार वर्षांत केलेल्या कामामुळे शहरवासीयांचाही भ्रमनिरास झाला. त्यातच वर्षभरापूर्वी राज्यातील सत्तेतून भाजपाला बाहेर पडावे लागले. तर नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने भाजपाला ही धोक्‍याची घंटा असल्याची चर्चा आत्तापासून सुरू झाली आहे. शहरी मतदार हा भाजपाला साथ देतो, ही बाबही पदवीधर निवडणुकीमुळे बेदखल ठरली. महाविकास आघाडीला शहरी मतदारही साथ देत असल्याचे निकालातून समोर आल्याने भाजपासाठी शहरातील पुढची वाटचाल खडतर ठरण्याचीच अधिक शक्‍यता आहे.

शहरामध्ये कॉंग्रेसचे अस्तित्त्व नगण्य असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. या दोन्ही पक्षाचे अनेक उमेदवार 2017 च्या निवडणुकीत खूपच कमी फरकाने पराभूत झाले होते. मोदी लाटेचा त्यांना फटका बसला होता. मात्र आता मोदी लाटही ओसरल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दोन्ही पक्षासह कॉंग्रेस एकत्र आल्यास भाजपाचा महापालिका निवडणुकीत पदवीधरच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.महापालिकेच्या अनेक निविदा प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या नेत्यांसह नगरसेवकांचा सहभाग आहे. 'मिल बांटके खाओ' अशीच काहीशी भूमिका गेल्या चार वर्षांपासून राष्ट्रवादीच्या ठराविक नेत्यांनी घेतली आहे. भाजपाला तोंड देखला विरोधत करण्यातच धन्यता मानणारे हे नेते विधानपरिषदेच्या निकालानंतर तरी सुधारणार का? असा प्रश्‍न आता विचारला जाऊ लागला आहे. पालिकेतील भ्रष्टाचाराच्या पापामध्ये अखंड बुडालेले काही राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते शहाणपण घेऊन जनहितासाठी पुढे न आल्यास मात्र त्याचा फटका या पक्षांनाही बसण्याची शक्‍यता आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी वर्षभरापासून मतदार नोंदीसाठी आक्रमक भूमिका घेत अधिकाधिक मतदार नोंदविणारी भाजपाची यंत्रणा मतदानाच्या दिवशी मात्र किती पोकळ होती हे स्पष्ट झाले. संपूर्ण पदवीधर मतदारसंघात पिंपरी-चिंचवडचे मतदान कमी झाले आहे. वरून भक्कम दिसणारी भाजपाची यंत्रणाही केवळ पोकळवासे ठरल्यामुळे देशमुख यांच्या मताधिक्‍यावर त्याचा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले. तर मतदारांसाठी मतदान केंद्र अतिदूर आल्याचाही परिणाम भाजपाच्या मतदारांवर झाल्याचे पहावयास मिळाले.


Post a comment

0 Comments